tvlog01दिवाळीच्या फराळातील सगळ्यात कठीण पदार्थ कुठले असतील तर ते अनारसे आणि चिरोटे. फराळातील इतर पदार्थाचे ठीक आहे, पण चिरोटय़ांचे काम तसे सोपे नाही. ते न मोडता करता आले तरच त्यांची भट्टी जमली असे म्हणता येते. कदाचित म्हणूनच हे पदार्थ वर्षांतून बहुधा एकदाच म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने केले जातात. चिरोटय़ांचा गोडवा आणि कुरकुरीतपणा दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. दिवाळीत बनविले जाणारे इतर पदार्थ आता सर्रास सर्वत्र बाराही महिने मिळतात. मात्र चिरोटे सहसा मिळत नाहीत. ठाण्यातील विष्णूनगर येथील प्रशांत ठोसर यांच्या राज स्नॅक्स कॉर्नरमध्ये मात्र उत्तम पद्धतीचे चिरोटे मिळतात. ठोसर यांच्या चिरोटय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे ते केवळ ठाण्यातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. परदेशात स्थायिक असलेली भारतीय मंडळी मायदेशी आल्यावर आठवणीने ठोसर यांच्या दुकानातील चिरोटे घेऊन जातात. आतापर्यंत त्यांच्या चिरोटय़ांनी तेराहून अधिक देशांत भ्रमंती केली आहे.
मूळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असलेल्या ठोसर दाम्पत्याला पाककलेची आवड असल्याने पंधरा वर्षांपूर्वी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ त्यांनी ‘राज स्नॅक्स कॉर्नर’ थाटले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी भगवती शाळेच्या शेजारी विष्णूनगर येथे त्यांचे नवीन दुकान सुरू केले. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारे पन्नासहून अधिक प्रकारचे पदार्थ तसेच  दरदिवशी चार ते पाच प्रकारच्या भाज्या येथे मिळतात. त्याचबरोबर उपमा, खिचडी, सांजा असे नाश्त्याचे प्रकार, तर वडा कटलेट, मटार करंजी आदी स्नॅक्सचे प्रकार येथे मिळतात. सहा महिन्यांपूर्वीच ठोसर यांनी ‘एस ठोसरस् क्वॉलिटी प्रोडक्ट्स’ हा त्यांचा स्वत:चा ब्रॅण्ड प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये चिरोटे हे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गोडय़ा-खाऱ्या शंकरपाळ्या, नारळाच्या वडय़ा, थालीपीठ भाजणी, पुरणपोळ्या, पातळ पोह्य़ांचा चिवडा आदी पदार्थ त्यांनी या ब्रॅण्डच्या नावाने प्रसिद्ध केले आहेत. परदेशी पाहुणे ठोसर यांनी तयार केलेल्या पुरणपोळ्यांनाही खास पसंती देऊ लागले आहेत.
तळताना चिरोटे फाटले तर करणाऱ्याचा विरस होतो. मात्र एकदा का पदार्थ जमला की त्यासारखा दुसरा आनंद नाही, असे ठोसर सांगतात. ठोसरांच्या स्नॅक्स कॉर्नरमधील पिठीसाखरेशी एकरूप झालेले, कुरकुरीत पण तोंडात गोडवा पसरविणारे चिरोटे खाणाऱ्याचे मन जिंकून घेतल्याशिवाय राहत नाहीत. चिरोटय़ांची मोठी गंमत म्हणजे गोडपणा हा त्याचा स्थायिभाव आहे. मग तुम्ही त्यांना पाकात घोळवा किंवा पिठीसाखरेत लोळवा, त्याची चव त्या पाकावर किंवा पिठी साखरेच्या प्रमाणावर ठरणार असते. तुपात तळताना त्याचे सगळे पदर सुटले पाहिजेत, तरच तो खुसखुशीत होतो. पण एकदा हा प्रकार जमला की, त्याच्या चवीला कशाचीही तुलना नाही. सध्या ‘राज स्नॅक्स..’मध्ये ‘साधा चिरोटा’ आणि ‘मेथी चिरोटा’ असे दोन प्रकार उपलब्ध आहेत, भविष्यात ‘पालक चिरोटा’ आणि ‘आंबा चिरोटा’ ते खवय्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.  चिरोटय़ांची पाककृती अनेक पुस्तकांमध्ये तसेच आजकाल इंटरनेटवरही वाचायला मिळते. पण वाचून करता येईल इतका हा साधा पदार्थ नाही. म्हणूनच या पदार्थाला अधिक मागणी आहे. चिरोटे रुचकर तर असतातच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असल्याचे संदर्भ आयुर्वेदिक ग्रंथांत आढळतात. चिरोटे पित्त-वाताला शमवतात. त्यामुळेच फराळाचे ताट चिरोटय़ांशिवाय अपूर्ण राहते.
शलाका सरफरे

राज स्नॅक्स कॉर्नर
* वेळ- सकाळी ७.३० ते रात्री ९ (रविवारी बंद)
* स्थळ- विष्णूनगर, भगवती शाळेच्या बाजूला, ठाणे (प.)
* किंमत- चिरोटे ४०० रुपये किलो.