‘‘पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या कार्यक्रम आयोजकाच्या तोंडाला काळे फासणे, भारत-पाकिस्तान सामन्यांना विरोध आणि गुलाम अली यांच्या गायन कार्यक्रमाला विरोध हा शिवसेनेचा केवळ बालिशपणा आहे. शिवसेना डरपोकांचा पक्ष आहे,’’ अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण येथे केली. कल्याण पूर्वेतील आमराई चौकात रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडले.
सत्तेत असूनही शिवसेनेकडून केली जाणारी आंदोलने म्हणजे दिखाऊपणा आहे. क्रिकेटचा सामना होऊ नये म्हणून आंदोलन, पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाविरोधात आंदोलन किंवा गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध ते करतात. परंतु सत्तेचा वापर करून शिवसेनेला हे थांबवता आले असते. मात्र ते रोखण्याची धमक त्यांच्याकडे नाही. कार्यक्रम आयोजकांच्या तोंडाला काळे कसले फासताय, हिंमत असेल तर थेट कानफटीत मारा, असे आव्हान त्यांनी दिले.
महाराष्ट्रात सत्तेत असताना सत्तेचा वापर करून कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सांगण्याची धमक शिवसेनेमध्ये नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेमध्येही सत्तेत आहात, मग बाहेर कसली आंदोलने करताय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारत-पाकिस्तानमधून समझोता एक्स्प्रेस आणि दिल्ली-लाहोर बससेवा सुरू आहे. हिंमत असेल तर ती बंद करून दाखवा, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेचे कार्यकर्ते शाईमार आंदोलन करतात, पण शाई कोणी मारली याचा पत्ताही नेतृत्वाला नाही. धर्माचे व जातीचे राजकारण करण्यापलीकडे शिवसेनेने काहीच केले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
..तर शिवसेना फुटेल
भाजप तुमच्यासह सत्तेत आहे आणि तो जर तुमचे ऐकत नसेल तर मग सत्तेत राहता कशाला, असा सवाल करत कधी सत्ता सोडायची आमचे आम्ही ठरवू, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार राज यांनी घेतला. सत्ता सोडली तर यांचे मंत्री, आमदार, खासदार पहिले फुटून दुसरीकडे जातील, या एकमेव भीतीमुळे यांना सत्ता सोडायची नाही. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय,’ अशी शिवसेनेची स्थिती आहे. भाजप यांना विचारत नाही. एकत्र सत्तेत असूनही महाराष्ट्राच्या प्रश्नावर यांची एकत्र एकही बैठक आजपर्यंत झाली नाही असे ठाकरे म्हणाले.

सावरकर, टिळक भारतरत्नापलीकडची व्यक्तिमत्त्वे.
गेल्या २० वर्षांमध्ये काय केले असे सांगण्यासारखे शिवसेनेकडे काहीच नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सावरकर, लोकमान्य टिळक यांना भारतरत्न द्या, असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. मात्र स्वातंत्र्यवीर आणि लोकमान्य हे एकदाच घडतात. ही व्यक्तिमत्त्वं भारतरत्नच्या पलीकडची आहेत. पुढे तर बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून एक मत द्या, असाही प्रचार सुरू असून हा शिवसेनेचा नाकर्तेपणा आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शस्त्र संग्रहालय उभारण्यात येणार असून त्याला बाळासाहेबांचे नाव देण्यात येणार आहे. ही मनसेच्या वतीने बाळासाहेबांना दिली जाणारी श्रद्धांजली असेल. यांच्याकडे सत्ता असूनही बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा मिळत नाही, अशी टीकाही राज यांनी केली.