किती अर्ज मागवले, किती मालमत्ता जमा याचा पोलिसांकडून तपास

माहिती अधिकाराचा गैरवापर करून खंडणी उकळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात अधिक पुरावे गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी किती अर्ज मागवले, त्याचा काय वापर केला, या आरोपींनी किती मालमत्ता जमवली याचा पोलीस तपास करीत असून महापालिकेकडून तशी माहिती मागवली आहे.

वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. अनेक मोठय़ा विकासकांनी बनावट दस्तावेज तयार करून तसेच परवानगी न घेता अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. यात अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश होता. अशा बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या बांधकामाची माहिती पालिकेतून माहिती अधिकारात मागवून नंतर याच माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्यात येत होती. कोटय़वधी रुपयांची खंडणी अनेकांनी विविध प्रकारे उकळली होती. याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालघर पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन महिन्यात पोलिसांनी तब्बल २० हून अधिक खंडणीखोरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. अजूनही ही कारवाई सुरूच आहेत. ज्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आली, त्यांनी तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आता या आरोपींविरोधात न्यायालयात भक्कम पुरावे उभे करता यावे यासाठी पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. या आरोपींनी किती माहिती अर्ज मागवले, त्या माहितीचे त्यांनी काय केले, न्यायालयात गेले का याची माहिती महापालिकेकडून मागवली आहे. एकच व्यक्ती विशिष्ट प्रकारची माहिती मागवत असल्याने त्याचा हेतू संशयास्पद होता हे पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता येणार आहे. आरोपींनी या मार्गाने कोटय़वधी रुपयांची खंडणी उकळली आहे. त्यामुळे त्यांनी किती मालमत्ता जमा केली, त्याचाही शोध सुरू आहे. या आरोपींचे उत्पन्नाचे स्रोत काय आणि त्यांच्याकडे आलेली प्रचंड मालमत्ता न्यायालयात सादर करून त्यांचा पैसा हा गैरमार्गाने आल्याचे सिद्ध करता येणार आहे. सध्या पोलिसांकडे प्रत्यक्ष खंडणीचे पैसे घेतल्याचे पुरावे नाहीत. अनेक प्रकरणांत परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले होते. आरोपींना त्याचा फायदा न्यायालयात मिळू शकतो. त्यामुळे आम्ही हे अतिरिक्त पुरावे गोळा करीत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.