खाडीत दुर्मीळ मासे आढळू लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने प्रदूषित झालेली कल्याण खाडी टाळेबंदीच्या तीन आठवडय़ांतच स्वच्छ रूपडे धारण करू लागली आहे. या खाडीतील पाण्यावरील रासायनिक तवंग नाहीसा होऊन पाण्याचा प्रवाहही स्वच्छ दिसू लागला आहे. परिणामी या खाडीतील जीवसृष्टी पुन्हा एकदा बहरू लागली आहे. गेल्या काही दिवसांत या खाडीत मोठय़ा प्रमाणात मासळी आढळू लागली असून अनेक दुर्मीळ मासे येथे दिसत असल्याचे ठाकुर्ली परिसरातील स्थानिकांचे म्हणणे आहे.

ठाकुर्ली, चोळे, कांचनगाव, नेतिवली, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गरीबाचापाडा, नवापाडा भागातील अनेक रहिवासी मासे पकडण्याचे गळ घेऊन खाडी किनारी मासेमारीला जात आहेत. दुपारपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संध्याकाळचे तिखट भोजन होईल अशी व्यवस्था या पकडलेल्या माशांच्या माध्यमातून स्थानिक मंडळी करीत आहेत. यामध्ये वेळ पण जातो आणि मासेमारीचा जुना छंद पण जोपासला जातो, असे या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ किसन चौधरी यांनी सांगितले. मासेमारीला जाताना आम्ही करोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याचे जे शासकीय आदेश त्याचे पालन करतो. गटाने आम्ही खाडीवर जात नाहीत. वेगवेगळे करून खाडी किनारी वेगळ्या भागात खडकावर बसून आम्ही मासेमारी करतो, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.

ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण परिसरातील बहुतांशी स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा यापूर्वी मासेमारी हाच पूर्णवेळ व्यवसाय होता. खाडीत जाळे टाकून मासे पकडणे, बोट खोल खाडी भागात नेऊन मासेमारी करण्याचे प्रकार त्यावेळी होते. कल्याण खाडीतील मासळी चवदार असल्याने ती स्थानिक कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील बाजारपेठांमध्ये विकली जायाची. मागील ४० वर्षांपासून कल्याण खाडीत मलनिस्सारणाचे सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडण्यात आले. सांडपाणी आणि प्रक्रियायुक्त रासायनिक सांडपाण्यामुळे या भागातील बहुतांशी जलचर स्थलांतरित झाले. जलप्रदूषणामुळे दिवसभर खाडीत संचार करूनही मासे मिळेनासे झाल्याने डोंबिवली, ठाकुर्ली भागातील मासेमारांनी हळूहळू मासेमारी व्यवसाय बंद केले. उल्हासनगरमधून सोडण्यात येणारे सांडपाणी, रासायनिक पाणी वालधुनी नदीतून कल्याणमधील गंधारे, बारावे भागातील खाडीला मिळते. गंधारे भागात रसायनमिश्रित पाण्याने नदी प्रदूषित झाली आहे. एकही जलचर दिसत नाही. या भागातील शेतकरी खाडी किनारी भागात भाजीपाला लागवड करून त्यासाठी खाडीच्या पाण्याचा वापर करतात, असे श्याम भोईर यांनी सांगितले.

मागील २५ दिवसांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे खाडीत सांडपाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे आम्ही काही छंदी मंडळी दररोज दुपारी गळ घेऊन खाडीवर येतो. काही जण सकाळीच येतात. यामध्ये चांगला वेळ पण जातो आणि आपला परंपरातगत व्यवसाय जपल्याचे समाधान मिळते, असे काथोड म्हात्रे यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्थानिक पालिका प्रशासनाने जलप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली तर कल्याण खाडीमधील जीवसृष्टी पुन्हा बहरेल, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.