|| सागर नरेकर/ भगवान मंडलिक

बाहेरून खरेदी करण्यासाठी रुग्णालयांकडून रुग्णांवर दबाव; तहसिलदारांची भरारी पथके नेमून तपासणीचे आदेश

डोंबिवली, बदलापूर : करोना उपचारात महत्त्वाचे ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी त्याच्या साठ्याचे वितरण जिल्हा प्रशासनामार्फत केले जात असले तरी, या इंजेक्शनचा काळाबाजार रुग्णालयांतूनच सुरू असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.  जिल्हा प्रशासनाकडून मिळालेला साठा संपल्याचे सांगत खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना बाजारातून इंजेक्शन खरेदी करण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदारांची भरारी पथके नेमून रुग्णालयांतील साठ्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील आणि ठाकुर्ली परिसरातील काही रुग्णालयांमध्ये हा गैरप्रकार अधिक असल्याच्या रुग्ण नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. राज्यभरात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतरही जिल्यात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. रेमडेसिविर काळ्याबाजारात चढ्या दराने विकले जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यात काही शहरांमध्ये रुग्णांच्या नावाने रेमडेसिविरची मागणी करून ते दुसऱ्याच रुग्णांना किंवा खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री केली जात असल्याची प्रकरणे आता पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्ष आणि स्वतंत्र यंत्रणा उभारूनही हा काळाबाजार थांबत नसल्याने जिल्हा  प्रशासनही भांबावून गेले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या यंत्रणेचे स्वतंत्रपणे लेखापरीक्षण करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे.

ठाणे जिल्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, मीरा-भाईंदर या आठ तालुक्यांच्या तहसिलदारांची नेमणूक या भरारी पथकात करण्यात आली आहे.

जिल्यातील कोविड रुग्णालये आपापल्या रुग्णालयातील रुग्णांच्या गरजेनुसार रेमडेसिविरची मागणी आपल्या महापालिकांकडे करत असतात. महापालिकांच्या माध्यमातून ही मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जाते. त्यानंतर जिल्हा प्रशासन मागणी आणि उपलब्धता यानुसार रेमडेसिविर पुरवत असते. मात्र ज्या रुग्णाच्या नावे रेमडेसिविर पुरवले गेले आहे, त्याच रुग्णाला रेमडेसिविर दिले गेले का, हे पडताळण्याची कोणतीही यंत्रणा नाही. रुग्णालये रेमडेसिविरच्या वापराची व्यवस्थित नोंद ठेवतात का, अशा सर्व गोष्टींची तपासणी या भरारी पथकातील सदस्यांनी करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी भरारी पथकातील सदस्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयांना भेटी देऊन ही पडताळणी करण्याचे आदेश या भरारी पथकाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहे.

कल्याण-डोंबिवलीत तक्रारी अधिक

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ९४ पैकी ८५ खासगी करोना रुग्णालयांना महसूल विभागाने रेमडेसिविर इंजेक्शन उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांच्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करून रिकाम्या बाटल्या हिशेबासाठी लेखापरीक्षकांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात इंजेक्शनचा साठा आहे. तरी काही डॉक्टर रुग्णाला हेतुपुरस्सर रेमडेसिविर इंजेक्शन लिहून देतात. ती बाहेरून आणण्यास सांगतात. नातेवाईकांना बाहेर कोठेही इंजेक्शन मिळत नाहीत. ते फिरून रुग्णालयात आले की डॉक्टर त्यांना एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक देतात. ती व्यक्ती डोंबिवली रेल्वे स्थानक, शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक, घरडा चौक येथे या असे सांगून त्या ठिकाणी बोलावते. त्यांच्याकडून रेमडेसिविरची दामदुप्पट किंमत वसूल करते, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत.

३५ हजार रेमडेसिविरचे वाटप

ठाणे जिल्यात १६ ते २८ एप्रिलपर्यंत ३५ हजार ८६० रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात सर्वाधिक रेमडेसिविर इंजेक्शन कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाटप करण्यात आले आहेत. तर सर्वात कमी रेमडेसिविर अंबरनाथ नगरपालिकेला देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली खासगी करोना रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. ज्या रुग्णालयांना ही इंजेक्शन पुरविली जातात तेथे ती इंजेक्शन मागणीप्रमाणे करोना रुग्णांना दिली जातात का, त्यांचा योग्य वापर रुग्णालयातच होतो का, याची तपासणी भरारी पथकाकडून केली जाणार आहे. रुग्णालयाकडून या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात गैरप्रकार झाले असल्याचे निदर्शनास आल्यास, तशा काही तक्रारी आल्यास तो अहवाल वरिष्ठांना पाठवून त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. – दीपक आकडे, तहसीलदार तथा पथक प्रमुख भरारी पथक, कल्याण तालुका