उपप्रादेशिक परिवहन कल्याण विभागाने ऑनलाइन लॉटरी पद्धतीतील प्रतीक्षा यादीतील ६५० रिक्षाचालकांना परवाना (इरादा पत्र) वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जून ते २५ जून या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती कल्याण विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी दिली.
आरटीओ कार्यालयात परवाना मिळवण्यासाठी यापूर्वी अनेक रिक्षाचालकांनी अर्ज केले होते. अनेकांना या परवान्याचे वाटप करण्यात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे ६५० रिक्षाचालकांचे वाटप थांबवण्यात आले होते. या चालकांना प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या उमेदवारांच्या अर्जाची संपूर्ण छाननी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे नाईक यांनी सांगितले. प्रतीक्षा यादीतील हे रिक्षाचालक अनेक वर्षांपासून रिक्षाव्यवसाय करीत आहेत.
तारखेप्रमाणे प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांकाप्रमाणे रिक्षाचालकांना आरटीओ कल्याण येथील कार्यालयात दुपारी ३ ते ५ वेळेत इरादा पत्र घेण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. तो तपशील पुढीलप्रमाणे आहे. १५ जून रोजी प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक १ ते ६५. १६ जून, अनु क्र. ६६ ते १३०. १७ जून, १३१ ते १९५, १८ जून, १९६ ते २६०. १९ जून, २६१ ते ३२५. २० जून, ३२६ ते ३९०. २२ जून, ३९१ ते ४५५. २३ जून, ४५६ ते ५२०. २४ जून, ५२१ ते ५८५. २५ जून, ५८६ ते ६५०.