नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफ्रेडीन’ पावडरच्या तस्करीप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या जय मुखी याला ठाणे पोलिसांनी सोमवारी नेपाळमधून अटक केली आहे. याप्रकरणातील तो महत्वाचा दुवा मानला जात असून त्याच्याकडून परदेशातील पावडर तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या वृत्तास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यासह परदेशात इफ्रेडीन पावडरची नशेसाठी विक्री होत असल्याचे ठाणे पोलिसांच्या तपासातून पुढे आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्य़ातील चिंचोली एमआयडीसीमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमीटेड कंपनीचा संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आठजणांना अटक केली होती. तसेच कंपनीतून मोठय़ाप्रमाणात इफ्रेडीनचा साठा जप्त केला होता. याप्रकरणात पुनीत श्रृंगी, जय मुखी आणि किशोर राठोड अशी या तिघांची नावे पुढे आली होती. त्यामुळे पोलिसांची पथके तिघांच्या मागावर होती. त्यापैकी पुनीतला पोलिसांनी महिनाभरापूर्वी मुंबईतून अटक केली तर जय मुखी हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. कुख्यात ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याच्यासोबत त्याची परदेशात भेट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच एव्हॉन कंपनीतील इफ्रेडीन पावडर परदेशात पाठविण्याचे काम तोच करत असल्याचेही तपासात समोर आले होते. त्यामुळे ठाणे पोलिस त्याचा माग काढत होते. तो नेपाळमध्ये लपून बसला होता. तेथून त्याला सोमवारी अटक करण्यात आली. ठाणे पोलिसांचे पथक त्याला मंगळवारी ठाण्यात घेऊन येणार असून त्यानंतर त्याची इफ्रेडीन पावडर तस्करीप्रकरणी चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.