सर्वेक्षण पूर्ण होऊनही प्रकल्प रखडला; मार्गावर १५ मोठय़ा निवासी इमारती

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला वसई-विरार शहरातील रिंगरूट प्रकल्प पुन्हा रखडला आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात अनेक अनधिकृत बांधकामांचा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर १५ मोठय़ा निवासी अनधिकृत इमारती असल्याने हा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

वसई-विरार महापालिकेने सर्व शहरे आणि गावांना जोडणारा रिंगरूट प्रकल्प तयार केला होता. १ ऑक्टोबर २०१० रोजी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. २६०० कोटी रुपयांचा हा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून ४ शहरे आणि २२ गावे जोडली जाणार आहेत. ३७ किलोमीटर आणि ६० मीटर रुंदीच्या हा मार्ग असणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा १३०० कोटींचा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत  प्रकल्प राबविला जाणार असून त्याच्या खर्चाला एमएमआरडीएने तत्त्वत: मान्यताही दिलेली आहे. टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यासाठी ३५ लाख रुपये खर्च आला. मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर अनधिकृत बांधकामांचा अडथळा समोर आला.

या मार्गावर खासगी आणि सरकारी जागा आहे. संबंधित सरकारी विभागाकडून जागा हस्तांतरित केली जाणार आहे, तर खासगी जागा मालकांकडून भूमी संपादन करून घेतली जाणार आहे. परंतु आता पालिकेपुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे, तो अतिक्रमणाचा. अनेक सरकारी जागेवर अतिक्रमणे झालेली आहेत. वाणिज्य अतिक्रमणे पालिकेला कारवाई करून काढता येईल, परंतु निवासी इमारतीचे काय करायचे, हा प्रश्न पालिके ला भेडसावत आहे. या मार्गावर १५ मोठय़ा निवासी इमारती असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवाय आचोळे येथे ३७ तर निळेमोरे येथे १५ अतिक्रमणांचा अडसर ठरत आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विरार, आचोळे, बऱ्हामपूर, बोळींज, दिवाणमान, डोंगरी, जुचंद्र, माणिकपूर, मोरे, नारिंगी आणि टिवरी येथील अनधिकृत बांधकामांचा अडथळा येत आहे.  अनधिकृ त बांधकामांचा अडसर आम्हाला भेडसावत आहे. परंतु आम्ही पहिला टप्पा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कार्यकारी अभियंता लाड यांनी सांगितले.

प्रकल्पाची माहिती

* एकूण लांबी : ३७ किलोमीटर

* रुंदी : ६० मीटर

* जोडणारी शहरे : ४

वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार

* जोडणारी गावे- २२

टिवरी, नारिंगी, गास, बऱ्हामपूर, समेळपाडा, सोपारा, विरार, कोपरी, जुचंद्र, गोखिवरे, डोंगरी, तुळींज, बोळींज, आचोळे, मोरे, राजावली, माणिकपूर, करमाळे, निळेमोरे, दिवाणमान, उमेळे