उल्हासनगरमधील दुर्घटना : ११ जणांची बचाव पथकांकडून सुटका

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प-१ भागातील मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सदनिकेच्या छताचा भाग कोसळून  थेट तळमजल्यापर्यंत आल्याने झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बचाव पथकांनी ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्घनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहराच्या कॅम्प-१ भागात चरणादास चौकात चारमजली मोहिनी पॅलेस ही इमारत आहे. शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  या इमारतीत नऊ  सदनिका आणि तळमजल्यावर आठ दुकाने होती. सदनिकांत ३० ते ३५ रहिवासी वास्तव्यास आहेत. दुर्घटनेनंतर इमारतीत १६ जण अडकले होते.  उल्हासनगर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तेथे पोहोचली.

दुर्घटनेनंतर काही रहिवाशांनी इमारतीतून बाहेर धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील पाच जणांच्या आचार्य कुटुंबाला खिडकीचे गज कापून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यासह ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले. यातील ९ जण किरकोळ तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत चार जणांचा  मृत्यू झाला आहे. पाचव्या मजल्यावरील डोडवाल कुटुंबातील हरेश डोडवाल (४०), ऐश्वर्या डोडवाल (२३) आणि संध्या डोडवाल यांचा मृत्यू ओढवलाआहे.  पहिल्या मजल्यावरील मिलिंद पारचे (१२) आणि सावित्री पारचे (६०) या आजी आणि नातवाचाही दुर्घटनेत अंत झाल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तेथे भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

‘आम्ही मृत्यू पाहिला’

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आचार्य कुटुंबातील सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आपण अगदी जवळून मृत्यू पाहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घरातील  छताचा भाग कोसळत असताना कमलेश आणि मेहेक आचार्य यांनी पाहिले. तितक्यात आपल्यावरही बांधकाम कोसळत असल्याचे दिसताच त्यांनी खिडकीकडे धाव घेतली. यावेळी घरात दोन लहान मुले आणि घरकामगार महिला होती. त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले. याच कुटुंबातील ज्येष्ठ जमनादास आचार्य योगायोगाने घराबाहेर पडल्याने बचावले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

१९९४ मधील बांधकाम, निकृष्ट रेतीचा वापर

मोहिनी पॅलेस इमारत ही १९९४ साली उभारण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या दशकात शहरात उलवा प्रकारची निकृष्ट रेती वापरून शेकडो इमारती बांधण्यात आल्या होत्या. मोहिनी पॅलेस इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत होती असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. मात्र या घटनेनंतर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेच्या संथगतीवर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे.