ठाणे महापालिकेनंतर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे परिवहन सेवेकडे आपला मोर्चा वळविला आहे. नुकतीच ठाणे परिवहन (टीएमटी) सेवेच्या अधिकारी-कर्मचारी यांची बैठक आयुक्तांनी घेतली आणि एका महिन्यात परिवहनसेवेचा कारभार सुधारण्याच्या दिशेने कामकाज करावे,असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत सर्व लोकप्रतिनिधींनी टीएमटीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ठाणेकरांना टीएमटीची सेवा चांगल्या प्रकारे मिळत नाही, बसेस भर रस्त्यात बंद पडतात, हक्काची परिवहन सेवा असतानाही नाहक रिक्षा किंवा खाजगी बसेसने प्रवास करावा लागतो, त्यामुळे टीएमटीची सेवा सुधारण्याबाबत आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे, अशी विनंतीही अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणात केली होती. त्यावेळी आयुक्तांनी आपल्या भाषणांतही ‘टीएमटीकडे मी लक्ष घालणार’ असल्याचे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार त्यांनी लगेचच टीमएटीच्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. त्यामुळे आता विसावलेले परिवहन अधिकारी, कर्मचारी निश्चितच कामाला लागतील यात शंका नाही.
ठाणे शहरात सध्या सर्वत्र अतिक्रमणे हटविण्याची मोहीम जोरदार सुरू आहे, याचे सर्व श्रेय हे पालिका आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहकार्य करणाऱ्या ठाणेकरांना जाते. परिवहन सेवा हे ठाणेकरांचे नेहमीचेच दुखणे झाले आहे, त्यामुळे अनेक ठाणेकर हे परिवहनवर विसंबून न राहता खाजगी बसचा आधार घेऊन ठाणे
शहर गाठतात, यामध्ये प्रवाशांचे पैसे जरी खर्च झाले तरी महत्त्वाचे म्हणजे वेळ वाचतो, पण ठाणे शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी परिवहन सेवाही सुधारली पाहिजे असेही त्यांचे मत असते. जर परिवहन सेवा सुधारली तर खाजगी बसवाहतुकीला निश्चितच चाप बसेल, परिणामी टीएमटीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. तीन हात नाका येथून घोडबंदर
पट्टय़ात जाण्यासाठी अनेक खाजगी बसेस, मिनी बसेस प्रवाशांसाठी थांबलेल्या असतात, तसेच या बसेसना नेहमीच प्रवाशांची गर्दी असते, जर हीच सेवा परिवहनमध्ये असलेल्या मिनी बसेसनी ठाणेकरांना दिली तर याचा फायदा परिवहन सेवेला होईलच शिवाय प्रवाशांमध्येही टीएमटीबद्दल विश्वासार्हता निर्माण होईल याकडेही आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
आज ठाण्यात बेस्टची सेवाही उपलब्ध आहे, ठाणे पूर्व ते बोरिवली, वृंदावन ते मुंबई, रेतीबंदर ते घाटकोपर अशा विविध मार्गावर बेस्ट आपली सेवा देत आहे आणि या सेवेलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टीएमटी मात्र मुलुंडपर्यंतच आपली सेवा देत आहे. त्यामुळे जर बेस्ट ठाण्यात येऊ शकते तर मग टीएमटीनेदेखील मुंबई आणि
परिसरात आपले पाय रोवण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न देखील सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे. ऐन गर्दीच्या वेळी अनेकदा टीएमटीच्या बसेस वेळेत येत नाहीत, मध्येच बस बंद पडणे हे तर नित्याचेच झाले आहे. त्यामुळेच परिवहन दिवसेंदिवस तोटय़ात जात असल्याचे ऐकायला मिळते.
मात्र, आता पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टीएमटीकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली असल्यामुळे निश्चितच टीएमटीचा डोलारा पुन्हा उभा राहण्यास सुरुवात होईल याची खात्री वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीमएटीच्या बसेसचा दर्जा सुधारणे, टीएमटी वाहकांना प्रवाशांशी व्यवस्थित संवाद साधण्याचे प्रशिक्षण देणे, वेळेत बससेवा उपलब्ध
करून देणे. ज्या मार्गावर खाजगी बसची वाहतूक सुरू आहे, त्या ठिकाणी परिवहनची सेवा सुरू करणे. बसेसची संख्या वाढविणे. बसेसच्या शेवटच्या स्टॉपवर विनाकारण वाहक व चालक यांनी वेळ घालविणे या सर्व बाबींवर आयुक्तांनी लक्ष ठेवून या बाबी सुधारण्याकडे भर दिल्यास निश्चितच टीएमटीचा कारभार येत्या काही दिवसांतच सुधारेल व पुन्हा एकदा ठाणेकर आयुक्तांना दुवा देतील यात शंका नाही. ठाणे महापालिकेची आर्थिक घडी बसविण्यास जशी आयुक्तांनी ‘संजीव’नी दिली तशीच परिवहन विभागाला दिल्यास खऱ्या अर्थाने ठाणे शहर हे स्मार्ट होईल यात शंका नाही.

Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस
आयुक्त,अतिरिक्त आयुक्तांची बदली; उपायुक्तांना राज्य सरकारचे अभय, उल्हास महाले पहिले कंत्राटी उपायुक्त ठरणार
BEST to install air purifiers, air purifiers in best buses, Mumbai air pollution, BEST Buses Install Mobile Air Purifiers
बेस्ट उपक्रमाच्या १७० बसगाड्यांवर हवशुद्धीकरण यंत्रे कार्यान्वित