सर्वपक्षीय नेत्यांची चौकशी, आणखी काही जणांवर बडगा; पाळेमुळे खणून काढण्याची मागणी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना नाडणाऱ्या राजकीय व्यवस्थेची पाळेमुळे खिळखिळी करणाऱ्या ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आता माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांच्या आणि त्यांना राजाश्रय देऊ पाहणाऱ्या नेत्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने येथील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अस्वस्थतेचे वातावरण आहे.

शहरातील बडय़ा बिल्डरांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडणीविरोधी पथकाने आतापर्यंत काही वर्षांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या आश्रयाला आलेल्या वादग्रस्त राजकीय पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांची ही कारवाई सुरू असताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंब्य्रात बेकायदा बांधकामे उभी केल्याचा ठपका असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकालाही बडतर्फ केल्याने पोलीस आणि महापालिकेची संयुक्त सफाई मोहीम सुरू झाल्याची चर्चा आहे.

ठाणे आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने या दोन्ही शहरांमधील काही वादग्रस्त नेत्यांना आयात करण्याचा धडाका लावला. उल्हासनगरात पप्पू कलानी पुत्र ओमी यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर ठाण्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाशी संबंधित काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना भाजपने पावन करून घेतले. भाजपच्या आश्रयाला गेल्यास आपल्याला राजाश्रय मिळेल या आशेवर यापैकी काही नेत्यांनी हसतमुखाने पक्षप्रवेश केला असला तरी हे पदाधिकारी खंडणी प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात सापडले. भाजपमधील निष्ठावान गटाकडून या कारवाईचे स्वागत होऊ लागले असून संघ परिवारातील काही मंडळीदेखील समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

वाचविण्यासाठी भाजपचा आश्रय?

हिरानंदानी बिल्डरकडून पुढे आलेल्या तक्रारीवरून खंडणीविरोधी पथकाने सुधीर बर्गे या माजी नगरसेवकास अटक केल्यानंतर या वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मोठी साखळी उघड होऊ लागली आहे. बर्गे हा शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांचा कट्टर समर्थक म्हणून एकेकाळी परिचित होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास करत बर्गे याने पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षीची पालिका निवडणूक त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकिटावर लढवली होती. बर्गेपाठोपाठ अटकेत असलेला राजकुमार यादव हा भाजपचा माजी नगरसेवक असून त्याची आई केवलादेवी यादव या रुपादेवी पाडा प्रभागातून भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. ठाण्यातील काही नेत्यांशी वाद झाल्यामुळे यादव कुटुंबीयाने भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र २०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत हे कुटुंब पुन्हा स्वगृही परतले होते. हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली माजी नगरसेवक सुधीर बर्गे, राजकुमार यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील या तिघांना अटक करण्यात आली आहे. या मंडळींनी खंडणी विरोधी पथकास दिलेल्या जबाबात शहरातील काही राजकीय नेत्यांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. या माहितीची पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. शौकत मुलानी आणि आरिफ इराकी या दोघा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अशाच स्वरूपाच्या दुसऱ्या एका गुन्ह्य़ात अटक करण्यात आली आहे. अशाच एका प्रकरणात मुंब्रा येथील राष्ट्रवादीचा एक बडा नगरसेवक आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांची येत्या काळात चौकशी तसेच अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

माहिती अधिकाराचा गैरवापर करत शहरातील व्यावसायिकांत दहशत निर्माण करू पाहणारे कोणत्याही पक्षातील असले तरी त्यांना रोखण्याची गरज आहे. येत्या काळात माहितीचा अधिकार मागविण्याची गरज पडणारच नाही, अशी पारदर्शक व्यवस्था ठाणे महापालिकेनेही तयार करायला हवी. सध्या जे अटकसत्र सुरू आहे ते या प्रकरणातील हिमनगाचे टोक असून ठाणे पोलिसांनी या सबंध प्रकरणाच्या खोलपर्यंत जाऊन भ्रष्टाचाराचे मूळ खणून काढायला हवे.      -संजय केळकर, आमदार, भाजप