भाईंदर : अपुऱ्या सोयीसुविधा आणि गरिबी याला कंटाळून काशिमीरा जवळील दाचकूल पाडय़ातील आदिवासींची शालेय मुले अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलांच्या पालकांनीच ही माहिती दिली असून स्थानीय प्रशासन सहकार्य आणि लक्ष देत नसल्यामुळे आदिवासींनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच मदतीसाठी धाव घेतली आहे.

काशिमीरा परिसरातील दाचकूल पाडय़ात आदिवासींचे वास्तव्य आहे. या पाडय़ात प्राथमिक सोयीसुविधांची वानवा आहे. या ठिकाणी ६ हजारांच्या आसपास आदिवासींची वस्ती असतानाही या ठिकाणी महापालिकेचे आरोग्य केंद्र नाही, लहान मुले प्रत्येक आठवडय़ाला परिसरातील दुर्गंधीमुळे आजारी पडत असल्याचे समोर आले आहे. दाचकूल पाडय़ात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने रहिवाशांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उघडय़ावरच प्रातर्विधी उरकावे लागतात. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पुरेशी शिक्षण व्यवस्था नाही. अशी या पाडय़ाची अवस्था आहे. अत्यंत गरिबी तसेच प्रशासनाकडून  सातत्याने होत असलेला दुर्लक्षपणा यामुळे परिसरातील शालेय मुले पैशांसाठी अमली पदार्थाचे सेवन आणि त्याची विक्री याकडे वळू लागले आहेत. पैशाचा मोह दाखवून काही लोक मुलांकडून अमली पदार्थाची तस्करीदेखील करून घेत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी परिसरातील अमली पदार्थाच्या मुलांनी नशेत ग्रामस्थांवर हल्ला चढवला आणि शस्त्राचा वापर करून काही नागरिकांना गंभीर जखमी केले होते. घटना गंभीर असल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना मदतीसाठी संपर्क केला; परंतु नेहमी प्रमाणे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचले. या परिस्थितीला कंटाळलेल्या आदिवासींनी मुख्यमंत्र्यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. आदिवासी पाडय़ातील सुविधांकडे होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाची दखल आता मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी, अशी मागणी सुनील कामडी यांनी केली आहे.

व्यावसायिकाची फसवणूक

भाईंदर : एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचे वितरक म्हणून नेमणूक करण्याचे आमिष दाखवून भाईंदर येथील  शुजाउद्दीन अन्सारी या व्यावसायिकाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  अन्सारी यांना काही दिवसांपूर्वी  वितरणाकासाठी दूरध्वनी करण्यात आला. इंदूर येथील होम शॉप डील या ऑनलाईन शॉपींग पोर्टलचा आपण प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे अन्सारी यांना वितरक म्हणून नेमणूकीसाठी १ लाख रुपये  बँके खात्यात हस्तांतर केले.  अन्सारी यांना आणखी पैसे पाठविण्याचे सांगण्यात आल्यानंतर अन्सारी यांना शंका आली आणि त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तRार नोंदवली.  पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.