आधारवाडी कचराभूमीवर ओला, सुका कचऱ्याची सरमिसळ कायम

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत दररोज तयार होणारा ओला, सुका कचरा वेगवेगळा न करता तो एकत्रितरीत्या आधारवाडी कचराभूमीवर टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने जमा करण्याची कोणतीही पद्धत पालिकेने अद्याप विकसित केली नसल्याने रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कल्याण, डोंबिवलीतील शहरवासीयांना घरात, सोसायटीच्या आवारात तयार होणारा ओला, सुका कचरा वेगळ्या पद्धतीने जमा करावा म्हणून गेल्या ऑक्टोबरमध्ये पालिकेने अनेक सोसायटय़ांना दोन स्वतंत्र प्लॅस्टिक डबेघरपोच दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये पालिकेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हे प्लॅस्टिकचे खोके ‘करून दाखविले’चा आविर्भाव आणत सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. मात्र या डब्यांचे करायचे काय, याची कोणतीही माहिती रहिवाशांना नसल्याने काही रहिवासी हे डबे आता चक्क पाणी भरण्यासाठी वापरत असल्याचे दिसून येते. अनेक सोसायटय़ांमध्ये हे डबे धूळ खात पडले आहेत. या डब्यांचा ओला, सुका कचरा टाकण्यासाठी वापर करा म्हणून पालिकेचा एकही अधिकारी घरोघरी फिरताना दिसत नाही, असे सोसायटी सदस्यांकडून सांगण्यात येते.

मुंबई उच्च न्यायालयात घनकचऱ्याच्या याचिकेची सुनावणी सुरूआहे. येत्या दहा दिवसांत पालिकेला कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट कशी लावली जाते, याची माहिती द्यायची आहे. पालिकेने कागदोपत्री कचरा विल्हेवाट लावण्याचे सर्व प्रकल्प पूर्ण करून ठेवले आहेत. ५५ आरोग्य निरीक्षक, मुकादमांचे पथक ओला, सुका कचऱ्याची योग्य रीतीने विभागणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी सात प्रभागांमध्ये नेमले आहे, पण हे पथक कधीच कोणत्या सोसायटीत जाऊन ओला, सुका कचरा वेगळा करता का, तो करावा म्हणून सोसायटी सदस्यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही.

कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, आधारवाडी कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे या कामासाठी नियुक्त करायचे ठेकेदार पालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे काम करण्यास पुढे येत नाहीत. पालिकेची कामे घेऊन देयके वेळेवर मिळाली नाहीत तर काय करायचे, असा प्रश्न या ठेकेदारांसमोर आहे. सध्या तरी कचरावेचक तिथे सुका कचरा वेगळा करतात.

रहिवाशांची नाराजी

आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवण क्षमता संपली आहे. ही कचराभूमी बंद करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला वारंवार नोटिसा दिल्या आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयास १५ जूनपर्यंत अहवाल सादर करायचा आहे. या सगळ्या हालचालींविषयी आयुक्तांसह प्रशासन एकदम थंड असल्याची टीका होत आहे. आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीने तर प्रशासनाची कचऱ्याविषयीची उदासीनता उघड केली असल्याची टीका रहिवाशांकडून करण्यात येत आहे.