पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी सुविधा

ठाणे पश्चिम स्थानक परिसर तसेच शहरातील महामार्गालगतच्या परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृहांसह आरामकक्षांची उभारणी करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) वापरात नसलेल्या भंगार बसगाडय़ांचा वापर महिला प्रसाधनगृहांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीएमटीच्या ७६ पैकी १० भंगार बसगाडय़ांची रंगरंगोटी करून व आवश्यक रचनाबदल करून त्यांचे महिला प्रसाधनगृहांत रूपांतर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील दहा ठिकाणी ‘टॉयलेट फॉर हर’ ही प्रसाधनगृहे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्वच्छतागृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या या आदेशांची अंमलबजावणी करत ठाणे महापालिकेने रेल्वे स्थानकाचा पश्चिम परिसर तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत स्वच्छतागृह, आरामकक्ष, स्तनपानासाठी बैठक व्यवस्था असलेल्या प्रसाधनकक्षांची निर्मिती केली आहे. यामुळे नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला असतानाच आता टीएमटीच्या भंगार बसगाडय़ांचा वापर करून महिलांना आणखी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्रामध्ये दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या अधिकारी परिषदेमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ७६ बसगाडय़ा भंगार झाल्याने त्या आगारात धूळ खात पडल्या आहेत.

या भंगार बसगाडय़ांवर जाहिरात अधिकार मोबदल्याचे देऊन त्यांचे स्वच्छतागृहामध्ये रूपांतरित करून त्या ‘टॉयलेट फॉर हर’ महिला प्रसाधनगृहासाठी वापरण्याचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी बैठकीत दिले होते.

भंगार गाडय़ांमधील स्वच्छतागृहे शहराच्या वेगवेगळ्या भागांत ठेवून त्यांची निगा आणि देखभाल, स्वच्छता यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने आता या स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी स्वच्छतागृहांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

एका बसमध्ये चार शौचकुपे

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील ७६ बसगाडय़ा भंगार झाल्या आहेत. त्यापैकी दहा बसगाडय़ांमध्ये पहिल्या टप्प्यात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून त्यामध्ये तीन ते चार शौचाकुपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी हे फिरते स्वच्छताकक्ष ठेवण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांना ज्या ठिकाणी मलवाहिन्या जोडणे शक्य होणार आहे, त्या ठिकाणी ही जोडणी केली जाणार आहे. मात्र ज्या ठिकाणी मलवाहिन्या जोडणे शक्य होणार नाही, त्या ठिकाणी स्वतंत्र टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.