ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना १० दिवस ठेवणार

ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी महापालिका प्रशासनाने विटावा भागातील शाळेमध्ये अलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील इतरांना करोनाची बाधा होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने एक हजार क्षमतेच्या अलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. या कक्षात सध्या २२५ कैदी ठेवण्यात आले आहेत.

येत्या काही महिन्यांत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून या काळात आरोग्य सुविधा अपुरी पडू नये म्हणून प्रशासन आतापासूनच उपाययोजना करीत आहे. ठाणे मध्यवधी कारागृहामध्ये तीन हजार ८०० कैदी आहेत. त्यात १५० महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहामध्ये दररोज सुमारे तीस नवीन कैदी दाखल होतात. यातील एखाद्या कैद्याला करोनाची लागण झाली असेल तर त्याच्यामुळे कारागृहातील इतर कैद्यांना करोनाची बाधा होऊ शकते. कारागृहात दररोज नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना अलगीकरण कक्षात दहा दिवस ठेवणे गरजेचे असून त्यासाठी कारागृहामध्ये पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. तळोजा कारागृहाच्या परिसरात अलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशानाकडून नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना नवीन कैद्यांना तळोजा अलगीकरण कक्षात पाठविले जात होते. ठाणे शहरामध्येच अशा अलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने महापालिकेकडे केली होती. त्यानुसार त्यास महापालिका प्रशासनाने मान्यता देऊन पालिका शाळा क्रमांक ७२ मध्ये एक हजार क्षमतेचे कैद्यांसाठी अलगीकरण कक्ष उभारणीचा निर्णय घेतला होता.

या जागेची ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. त्या वेळेस अधीक्षक अहिरराव यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोखंडी गज आणि शटर बसविणे, इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याची कामे करण्याची सूचना केली होती. त्यानुसार १९ लाख ५४ हजार ५६१ रुपये खर्चून पालिकेने ही कामे केली आहे.

नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील इतरांना करोनाची बाधा होण्याची शक्यता असते. महापालिकेकडे केलेल्या मागणीनुसार त्यांनी विटावा भागात अलगीकरण कक्ष उभारले असून तिथे २२५ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी नव्या कैद्यांना दहा दिवस ठेवून त्यानंतर कारागृहात ठेवले जाते.

– हर्षद अहिरराव, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह