उल्हासनगरच्या कॅम-४ येथील महावितरण कार्यालयात जुगार खेळणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हे कर्मचारी कार्यालयात जुगार खेळत असल्याचे समोर आले होते. कार्यालयातील साहाय्यक अभियंता यांनी त्यांना मुद्देमालासह पकडले.

कामातील दिरंगाईमुळे कायम ग्राहकांच्या टीकेचे धनी होणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. उल्हासनगर शहरातील लालचक्की येथील महावितरण कार्यालयात शनिवारी सायंकाळच्या सुमारास काही कर्मचारी जुगार खेळत असल्यास ते लक्षात आले. याची माहिती मिळताच  कार्यालयातील एका साहाय्यक अभियंत्याने कार्यालयात प्रवेश करत कर्मचाऱ्यांच्या जुगार खेळण्याची  चित्रफीत चित्रित केली.

वरिष्ठ अधिकारी आल्याचे कळताच जुगार खेळत असलेल्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पत्ते आणि पैसे तिथेच टाकत कर्मचाऱ्यांनी पळ काढला. मात्र तोपर्यंत सर्व सात कर्मचारी चित्रफितीत चित्रित झाले होते. यातील चार कर्मचारी हे कायमस्वरूपी नोकरीवर असून तीन कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले होते, अशी माहिती महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग- चारचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी सांगितले आहे. याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच सातही कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर कार्यालयीन कारवाई करण्यात आली असून अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.