सागर नरेकर

धरणाच्या पाण्याअभावी तीव्र टंचाई, दूषित पाण्यावर ग्रामस्थांची गुजराण

निश्चलनीकरणानंतर देशातील पहिले रोकडमुक्त गाव म्हणून करण्यात आलेल्या शासकीय गाजावाजामुळे प्रकाशझोतात आलेल्या मुरबाड तालुक्यातील धसई गावाला आता ‘जलमुक्ती’ची भीती सतावू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावात तीव्र पाणीटंचाई असून आटलेल्या विहिरी, रखडलेली धरणदुरुस्ती आणि पाणीपुरवठा योजनेचा अभाव यांमुळे येथे दुष्काळी स्थिती अवतरली आहे. नाइलाजाने येथील ग्रामस्थांना विहिरींच्या तळाशी असलेल्या दूषित पाण्यावर गुजराण करावी लागत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले रोकडमुक्त गाव म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्या वेळी गावात सदैव शासकीय अधिकारी आणि नेतेमंडळींचा राबता असायचा; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत असताना शासकीय यंत्रणेने डोळे मिटून घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

मुरबाड तालुक्यात अनेक छोटे-मोठे बंधारे आणि धरणे आहेत. धसई गावापासून काही अंतरावर देवधर धरण आहे. त्याची निर्मिती शांताराम घोलप यांच्या कार्यकाळात ३२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या धरणातून कालव्याला पाणी पुरवणारी विहीर कोसळल्याने धरणात पाणीसाठा होत नव्हता. गेल्या वर्षांत या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. यंदाच्या वर्षी पाऊस लवकर परतल्याने पाणी पातळी खालावली. धरणाची विहीर दुरुस्त करण्यासाठी त्यातील पाणीसाठाही रिकामा करण्यात आल्याने धसई आणि आसपासच्या भागातील विहिरी आटल्या आहेत. गेल्या ३२ वर्षांत कधीही न आटलेल्या विहिरी यंदा आटल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे पाणीटंचाईत आटलेल्या विहिरीतील दूषित पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मात्र दुरुस्तीच्या कामाचा टंचाईशी थेट संबंध नसल्याची माहिती लघू पाटबंधारे विभागाच्या रायगड विभागातील शाखा एकचे कनिष्ठ अभियंता सुधीर सावंत यांनी दिली आहे.  धसई आणि आसपासच्या गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र काम पूर्ण होऊ नही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे गावाला यंदाच्या वर्षांत भीषण पाणीटंचाई सहन करावी लागत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गायकर यांनी केला आहे.

तालुक्यातील १८ गावे आणि ३८ पाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. धसईलाही पाणी पुरवण्यात येते आहे.

-अमोल कदम, तहसीलदार, मुरबाड तालुका.