लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतरही कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘वजन’ अद्याप कायम असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. ही निवडणूक एकत्रपणे लढवावी का, याविषयी शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह दिसत असताना या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत जवळीक सुरू केली आहे. मागील निवडणुकीत मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. सध्याचे चित्र या पक्षासाठी तितकेसे अनुकूल नसले तरी युतीमधील दोन्ही घटक पक्षांनी मनसेला सोबत घेण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना सुरू केल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, मनसेतील काही नगरसेवक शिवसेना, भाजपच्या वाटेवर असताना युतीच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू केल्याने मनसेतील गयाराम नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. दरम्यान, मनसेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मनसे पालिका निवडणूक लढविणार आहे. आयाराम, गयारामांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. कोणाला पक्षात प्रवेश द्यावयाचा याबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील, अशी माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
महापालिका निवडणुकीत सेना, भाजप स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करीत आहेत. तसे संकेत पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील आपल्या नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे सोबतीला जोडीदार असावा म्हणून सेना, भाजपने मनसेबरोबर गुप्त बोलणी सुरू केली आहेत. जो सन्मानाने हात पुढे करून टाळी घेण्यासाठी येईल, त्याला सन्मानाने टाळी देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका नेत्याने दिली.
या हालचालींमुळे मनसेमधून सेना, भाजपमध्ये जाणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे. प्रभाग रचना, आरक्षण जाहीर होत नसल्याने अनेक नगरसेवक, पदाधिकारी कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याची कल्याण, डोंबिवलीतील सध्याची परिस्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी रमेश हनुमंते यांची निवड झाल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाध्यक्षांकडे पाठवले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष पद न मिळाल्याने हनुमंते गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्याचा वचपा यावेळी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने काढला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही फूट कायम राहिली तर त्याचा लाभ उठवण्याची संधी शिवसेना, भाजपकडून शोधली जात आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसचे महापालिकेतील काही पदाधिकारी, नगरसेवक सत्ताधारी युतीच्या बाजूने नेहमीच सूत्रे हलवत असतात. या पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सेना, भाजपकडून सुरू झाले आहेत. या सगळ्या हालचालींचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपले बालेकिल्ले आणि प्रभाग भक्कम बनवण्यासाठी सेना, भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.