सहा वर्षांपूर्वी मिरा रोड येथून चोरीला गेलेल्या कारचा तब्बल सहा वर्षांनी शोध लागला असून, या चोरी प्रकरणी शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
सिद्धार्थ पाटील यांची इनोव्हा कार डिसेंबर २००९ मध्ये चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र कारचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. गेल्याच आठवडय़ात पाटील यांना त्यांच्या कारसारखीच एक गाडी दिसली. परंतु तिचा क्रमांक वेगळा होता. कुतूहलापोटी त्यांनी गाडीच्या क्रमांकावरून मालकाचा पत्ता शोधून काढला. तो अंधेरी येथील निघाला. मात्र त्या पत्त्यावरील त्याच्याकडे त्याच क्रमांकाची वेगळी गाडी असल्याचे स्पष्ट झाले. पाटील यांनी ही बाब मिरा रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने प्रफुल्ल शिरसाट याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासणीत शिरसाट याच्याकडील गाडीच्या इंजिनाचा व चेसिसचा क्रमांक पाटील यांच्या चोरीला गेलेल्या गाडीच्या क्रमांकाशी जुळला. त्यानंतर पोलिसांनी शिरसाट याला अटक केली.