कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांची नस ओळखलेल्या शिवसेनेने शहरातील मनोरंजनात्मक प्रकल्पांचे पालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे. रविवारी अनेक रहिवासी घरी असतात. याचा फायदा घेत रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कारंजे, मोकळ्यावरील व्यायामशाळा, संगीत धून प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्य कामे बाजूला सारून जनतेला भूलविणाऱ्या या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यावरच शिवसेनेचा भर दिसून येत आहे.गेल्या पाच वर्षांत रस्ते, वीज, पाणी, खड्डे या या समस्यांकडे किती लक्ष दिले यापेक्षा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांना भरगच्च सांस्कृतिक, गाण्यांच्या कार्यक्रमात रंगविले की ही मंडळी मतदानाच्या दिवशी मदतीचा हात पुढे करतात, याची पक्की जाणीव शिवसेना, भाजपच्या स्थानिक, जिल्हा नेत्यांना आहे. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेने आपली प्रचाराची रणनीती या वेळी आखली आहे.गेल्या पाच वर्षांत शहरात सत्ताधारी शिवसेना-भाजप म्हणून आपण कोणते प्रकल्प मार्गी लावले. सीमेंट रस्ते, रखडलेल्या प्रकल्पांची अवस्था काय, वाहतूक कोंडीमुळे हैराण असलेल्या शहरवासीयांचे काय, या विषयावर नेहमीच मौन बाळगून असलेल्या शिवसेना नेत्यांनी आता शहरात रविवार सुट्टीचा दिवस पाहून छोटय़ा, किरकोळ प्रकल्पांचे उद्घाटन करून ‘करून दाखवले’च्या गमजा मारण्यास सुरुवात केली आहे.रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य यांच्या हस्ते काळा तलावाच्या काठी सकाळ, संध्याकाळ येणाऱ्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी मोकळी व्यायामशाळा, शतपावली करणाऱ्यांना शांत चित्ताने संगीताच्या धुनीवर चालता यावे यासाठी संगीत धून लावण्यात आली. तसेच विठ्ठलवाडी येथील तलावात रंगीत कारंजे सुरू करण्यात आले आहेत. अशा देखाव्याचे प्रकल्प लोकार्पण करून करून दाखवलेचा मोठा देखावा पालिका निवडणूक काळात शिवसेनेकडून उभारण्यात येईल. अनेक वर्षांपासूनची शिवसेनेची ही परंपरा या वेळीही चालू असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. पाच वर्षांत कल्याण, डोंबिवलीकडे न फिरकणारे शिवसेनेचे नेते गेल्या दोन महिन्यांत या भागात येऊन विद्यार्थ्यांना मोफत टॅबवाटप, रस्ते पाहणी करणे, साथीच्या रोगांसंबंधी बैठका घेणे, रेल्वे स्थानक भागातून पायी प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेणे आदी कामे करू लागली आहेत.