ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून सोमवारी भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही माघार घेतल्याने आता शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे या विराजमान होण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे आता मुंबईपाठोपाठ ठाण्यातही शिवसेना-भाजपमधील तणाव निवळू लागल्याचे दिसत आहे. ठाण्यात आज महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. भाजपकडून महापौरपदासाठी आशा सिंह व उपमहापौरपदासाठी मुकेश मोकाशी यांनी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादीकडून अश्रीन राऊत यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला होता. मात्र, आता हे सर्वजण आपापले अर्ज मागे घेणार आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप कोणाच्या बाजूने मतदान करणार की तटस्थ राहणार, याबाबत काहीही कळलेले नाही.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच महापालिका मुख्यालयात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी भगवे झेंडे तसेच फलकांची उभारणी करत शिवसेनेने रविवारपासूनच वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच हत्तीही उभे करण्यात आले असून पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळाही उभारण्यात आला आहे. याशिवाय, पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले असून उद्धव यांच्या उपस्थितीत नवनियुक्त महापौर, उपमहापौरांची शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर भाजपला मोठे यश मिळत असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने प्रथमच एकहाती सत्तेचा पल्ला गाठला. मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान उभे केले जात असताना ठाणे महापालिकेत ६७ नगरसेवकांचा आकडा गाठत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. या मोठय़ा विजयानंतरही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी फारसा जल्लोष करणे टाळले होते.

ठाण्याच्या नव्या महापौर मीनाक्षी शिंदे  घोडबंदर परिसरातील मानपाडा भागातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी यापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष पद तसेच स्थायी समितीचे सदस्यपद भूषविले आहे. ठाण्याचे यंदाचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यातच अनेक नेतेमंडळींच्या कुटुंबातील महिला यंदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याने महापौर पदाची पक्षांतर्गत चुरस वाढली होती. या स्पर्धेत नंदिनी राजन विचारे, जयश्री रवींद्र फाटक आणि परिषा प्रताप सरनाईक यांची नावे पुढे आल्याने पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा सुरू झाली होती. यापैकी परिषा सरनाईक यांनी हक्काचा प्रभाग सोडून सुधाकर चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात उडी घेत विजय खेचून आणला होता. तसेच नव्या ठाण्याचा एक भाग असलेल्या या प्रभागात विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य होते. त्यामुळे घराणेशाहीपेक्षा परिषा यांचा विजय अधिक संघर्षमय होता, असा दावा त्यांचे समर्थक करत होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आपल्या कट्टर समर्थक मीनाक्षी शिंदे यांच्या बाजूने कौल दिला होता.