जयेश सामंत

ठाणे शहरातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. येथील महापालिकेत गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तापदी राहिलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन जुन्या मित्रपक्षांमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्दय़ावरून कलगीतुरा रंगू लागला आहे. केंद्रात आणि राज्यात हवा कुणाचीही असो वा सत्तेच्या चाव्या कुणाच्याही ताब्यात असोत ठाण्यात नेहमीच शिवसेनेचा आवाज राहिला आहे. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ठाण्याचा बालेकिल्ला गमवावा लागला आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत नौपाडय़ातही भाजपने सेनेला धूळ चारली. एकनाथ िशदे यांचा वागळे आणि प्रताप सरनाईकांच्या वर्तकनगर पट्टय़ाने साथ दिल्याने महापालिकेत एकहाती सत्तेचे स्वप्न शिवसेनेला पूर्ण करता आले खरे, मात्र जुन्या ठाण्याची हवा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही हे शिवसेनेतील जुने-जाणतेही मान्य करतात. याच जुन्या ठाण्याच्या जोरावर भाजपचे नेते दररोज शिवसेनेतील दिग्गजांना अंगावर घेताना दिसत आहेत. ठाण्यातील सत्तेत वाटेकरी राहिलेले हे दोन पक्ष एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. यानिमित्ताने का होईना या महापालिकेतील सावळागोंधळ ठाणेकरांपुढे येत आहे. म्हणूनच निवडणुकीच्या वर्षांतील हा शिमगा ठाणेकरांसाठी मनोरंजनाचा खजिना उघडणारा ठरेल याच शंका नाही.

ठाण्यातील सत्तेत वाटेकरी असला तरी भाजप येथील शिवसेना नेत्यांच्या लेखी कधीच खिजगणतीत नव्हता. नौपाडय़ातील संघनिष्ठांच्या मतांसाठी शिवसेना नेते भाजपला चुचकारत. निवडणुका आल्या की संघाच्या प्रभात बैठकांना हजेरी लावत. लहान-मोठय़ा कार्यक्रमांसाठी सढळ हस्ते मदत करत. एवढे केले तरी भाजपची ही परंपरागत मते विधानसभा-लोकसभा निवडणुकीत सहजच पदरात पडतात असा अनुभव असल्याने शिवसेनेला भाजपची फारशी चिंता कधीच वाटली नाही. ठाण्यात आणि डोंबिवलीतही संघाच्या वर्तुळात वावरणाऱ्यांसोबत उत्तम संबंध राखले की काम फत्ते हे शिवसेना गोटातील जणू समीकरण. अधूनमधून भाजपचे स्थानिक नेते नौपाडय़ात शिवसेनेला आवाज देत. परंतु कडव्या संघटनेच्या जोरावर हे आव्हानही शिवसेना परतून लावत असे. देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र हे चित्र बदलू लागले आहे. एकनाथ िशदे यांच्या तोडीचा नेता आजही भाजपकडे नाही आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा या पक्षाचे नेते आणि समर्थक करत असतात. बऱ्याच अंशी यामध्ये तथ्य असले तरी जुन्या ठाण्याची हवा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही याचे भान शिवसेनेच्या जुन्या जाणत्यांनाही येऊ लागले आहे. ठाणे म्हणजे आमचेच या आविर्भावात वावरणाऱ्या सेना नेत्यांना विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी जमिनीवर आणले. त्यापाठोपाठ नौपाडय़ातही भाजपने सेनेला धक्का दिला. आक्रमक राजकारणासोबत मुत्सद्दीपणात एकनाथ िशदे यांचा हात धरणारा नेता सध्या तरी ठाण्यात नाही. विरोधी पक्षातील हायकमांडसोबत मधुर संबंध ठेवत स्थानिक राजकारणातील फासे आपल्या बाजूने पाडून घेण्याचे कसब िशदे यांना चांगले अवगत आहे. डोंबिवलीत शिवसेनेच्या जबडय़ात हात घालण्याची भाषा करणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्याच्या रणधुमाळीत झोकून देताना फारसे दिसले नाहीत हे संघासह जुन्या भाजप नेत्यांनाही अचंबित करणारे होते. वरिष्ठ पातळीवर वाटाघाटींमध्ये वेळ पडल्यास दोन पावले मागे जायचे, त्याच वेळी सैनिकांमध्ये मात्र आक्रमक स्वभावाचा बाज कायम राखायचा हे िशदे यांच्या राजकारणाचे वैशिष्टय़ राहिले आहे. त्याचा फायदा ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेला वेळोवेळी होताना दिसतो. गेल्या वर्षभरात राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता तोळामासा वाटत असला तरी स्थानिक भाजपला आता फार काळ गृहीत धरता येणार नाही हे गेल्या काही दिवसांच्या घडामोडींवरून दिसू लागले आहे.

दोस्तांची चिखलफेक

जेमतेम २३ नगरसेवकांच्या जोरावर भाजप शिवसेनेला दररोज अंगावर घेऊ लागल्याने शिवसेनेतील अस्वस्थताही आता वाढू लागली आहे. यांची ती काय ताकद.. हे खासगी बैठकीत बोलायला ठीक परंतु भाजपच्या आरोपांना दररोज उत्तर देण्याची वेळ शिवसेना नेत्यांवर येऊ लागली आहे हे या पक्षाचे नेते खासगीत मान्य करू लागले आहेत. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात फारसा शहाणपणा नसतोच. जुन्या ठाण्यात भाजपचा आमदार आहे. तरी शिवसेनेची संघटनात्मक ताकद भाजपपेक्षा किती तरी अधिक आहे. त्यामुळे सत्तेची ताकद तळागाळांतील शिवसैनिकांसाठी वापरायची अधिक गरज होती तेव्हा महापालिकेतील पक्षाचे चाणक्य नौपाडय़ातील भाजप नगरसेवकांना कुरवाळण्यात मग्न दिसत तेव्हा शिवसैनिकांची काहिली होत असे. मुद्दय़ापासून गुद्दय़ापर्यंत सर्वप्रकारची रसद पडद्यामागून या नगरसेवकांमागे उभी करण्यात धन्यता मानणाऱ्यांना आता हेच मित्र हैराण करू लागले आहेत हा काव्यगत न्यायच म्हणायला हवा. ठाण्यात महापालिकेच्या परवानगीने उभारण्यात आलेल्या होर्डिग्जचा मुद्दा सध्या भलताच गाजतो आहे. ठरावीक ठेकेदारांचे हित साधण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागा आंदण दिल्या जात असल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेवर प्रहार केला. भाजपकडून अशा टीकेची सवय नसलेले शिवसेना नेते यामुळे बिथरले. होर्डिग्जचा ठेका कुणाचा आहे हे जाहीर केले तर भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे प्रत्युत्तर शिवसेना नेत्यांनी दिले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे मूळ ठेक्यात बरेच गौडबंगाल आहे आणि इतकी र्वष दोन्ही बाजूंकडून चिडीचूप व्यवहार सुरू होता हे उघड झाले ते बरेच झाले. शहरातील होर्डिग्जचा सर्वात मोठा ठेका भाजपमधील एका वरिष्ठ महिला नेत्याच्या पतीराजांना मिळाल्याची जुनी चर्चा आहे. भाजपचा हा जावई शिवसेनची एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेत शिरकाव करतो आणि मोक्याचे कंत्राट पदरात पाडून घेतो यात बरेच काही आले. एरवी महापालिकेतील ठेक्यांची खडान्खडा माहिती ठेवणाऱ्या शिवसेना नेत्यांना हे सगळे अंधारात ठेवून झाले यावर शेंबडय़ा पोराचाही विश्वास बसणार नाही. हा ठेका मिळवताना मूळ ठरावात समावेश नसलेल्या जागांवरदेखील या कंत्राटदाराने होर्डिग्ज उभारून महिन्याला लाखो रुपयांची माया जमविणे सुरू ठेवल्याचा आरोप आहे. अशाच एका भाजपनिष्ठ नेत्याशी जवळीक साधून असणाऱ्या ठाण्यातील एका व्यापाऱ्याला काही होर्डिग्जचे तीर्थ प्राशन करण्याची संधी तत्कालीन प्रशासनाने दिली आहे. या सगळ्यात महापालिकेचा मोठा महसूल बुडत आहे अशा तक्रारी पुढे येत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना साकडे घातल्याशिवाय हे सगळे शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यातही मोक्याच्या जागांवरील काही होर्डिग्जची अप्रत्यक्ष मालकी ठरावीक नेत्यांकडे वर्ग करून सगळ्यांची तोंडे बंद राहतील अशी व्यवस्था उभी केली गेल्याची चर्चा आहे. इतके दिवस हे सगळे गुण्यागोिवदाने सुरू असताना भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी यावरून थेट शिवसेनेवर आरोप सुरू केल्याने आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे.

हे ठेके तर भाजप नेत्यांचे आहेत, त्यामुळे आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही असा पवित्रा आता शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. परंतु हे ठेके मिळाले कुणामुळे, महापालिकेचे खरेच नुकसान होत असेल तर मग त्याकडे सत्ताधारी म्हणून कानाडोळा का केला गेला असे प्रश्न समंजस ठाणेकरांना यानिमित्ताने पडल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्यावर चिखल उडविता आहात तर आता बघा आम्ही तुमची अवस्था काय करतो, असा आवाज सध्या सत्ताधारी बाकावरील काही नेते देताना दिसत आहेत. आमच्या पंखाखाली असाल तोवर आपण दोघे भाऊ भाऊ अन्यथा आम्हीही तुमची लफडी बाहेर काढू हा या आव्हानाचा सरळसरळ अर्थ. ठाणे महापालिकेतील भांडवली आणि मांडवली राजकारणाच्या या चिखलात दोन जुने मित्र नव्याने भांडत लोळण घेत असताना या चिखल खेळाचा आनंद ठाणेकरांनी मनसोक्त लुटायला हवा. कारण या खेळाचा हा पहिलाच अंक आहे.