कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुरेशा प्रमाणात परिचारिका नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक वर्षांपासून परिचारिकांची भरती करण्यात आलेली नाही. निवृत्त परिचारिकांच्या रिक्त जागा भरलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची क्षमता १२० खाटांची आहे. शहरांमधील ३० खाटांची क्षमता असलेली सूतिकागृह, तीन बाह्य़रुग्ण सेवा दवाखाने आहेत. १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात परिचारिका नाहीत. त्यामुळे उपलब्ध परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे.
महापालिका रुग्णालये, दवाखान्यातील रुग्णांची संख्या पाहता सद्य:स्थितीत महापालिकेला सुमारे ५० ते ६० परिचारिकांची गरज आहे. उपलब्ध परिचारिका रुग्णसेवा करून त्याच वेळी शस्त्रक्रिया खोलीत तज्ज्ञ डॉक्टरांना साहाय्य करीत असतात. रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या वेळीच नेमक्या परिचारिका शस्त्रक्रिया विभागात मदतीसाठी गेलेल्या असतात. याशिवाय कागदोपत्री अनेक कामे परिचारिकांना करावी लागतात. ती कामे रुग्ण सेवा सांभाळून करावी लागतात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर पालिकेतील काही परिचारिकांनी दिली.
डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्या प्रमाणात परिचारिकांची संख्या वाढवली तरच रुग्णांना वाढीव डॉक्टरांच्या सेवेचा लाभ होणार आहे. दरम्यान, परिचारिका, रुग्ण सेवक यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शासनाची काही बंधने असल्याने पालिकेला थेट भरती करता येत नाही. येणाऱ्या काळात ही रिक्त पदे भरण्यात येतील, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.