कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती; दोन तास ताटकळल्यानंतर नागरिकांची घरी पाठवणी

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना लसीकरण केंद्र असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नोंदणीकरण करून खासगी रुग्णालयात जाणाऱ्या ज्येष्ठांना लस उपलब्ध नाही म्हणून घरी परतावे लागत आहे. लशीचा मुबलक साठा नाही म्हणून डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयाने तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

मागील दोन महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीत महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर येथे अत्यावश्यक सेवा कर्मचारी, सामान्यांसाठी करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे करोना प्रतिबंधासाठी आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी लसीकरणासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोजक्याच ठिकाणी यापूर्वी करोना लशीचे लसीकरण सुरू असल्याने उपलब्ध लशीचा साठा नोंदणीकरण केलेल्या ज्येष्ठांना देणे पालिकेला शक्य होत होते. गेल्या आठवडय़ापासून पालिका हद्दीत डोंबिवलीत एम्स, आर. आर., टिटवाळा येथील श्री महागणपती, ईशा नेत्रालय या चार खासगी रुग्णालयांनी करोना लसीकरण शासन मान्यतेने सुरू केले आहे. पाथर्लीतील शाळा क्र. ६२, कल्याणमध्ये आर्ट गॅलरीमध्ये पालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांमध्ये शासन नियमानुसार ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्या रहिवाशांना लसीकरण केले जाते. खासगी रुग्णालयांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या भांडार कक्षातून लशीच्या कुप्या दिल्या जातात. पालिकेला जिल्हा आरोग्य विभागाकडून जेवढय़ा कुपी उपलब्ध होतात, तेवढय़ाच कुपी पालिकेचा वैद्यकीय विभाग सम प्रमाणात पालिका आणि खासगी रुग्णालयांना वाटप करतो, असे वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. पालिका रुग्णालयांमध्ये मोफत करोना लस मिळत असल्याने या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आणि रांगेत उभे राहायला नको म्हणून काही ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले महिला, पुरुष खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण व्हावे म्हणून नोंदणीकरण करत आहेत. नोंदणीकरण केलेले रहिवासी खासगी रुग्णालयातून आलेल्या संदेशाप्रमाणे लसीकरणासाठी दिलेल्या वेळेत गेले की तेथे दोन ते तीनतास थांबल्यानंतर रहिवाशांना लशीचा साठा संपला आहे. तुम्हाला उद्या लस दिली जाईल, असे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशीचे क्रमवारीतील खूण क्रमांक (टोकन) दिले जाते. एवढा वेळ थांबून लस न मिळाल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. काही रहिवाशांना दुसऱ्या दिवशी लसीकरणासाठी या म्हणून खासगी रुग्णालयातून संदेश येतात. पण याच रुग्णालयातून नंतर तुमची वेळ आणि दिवस बदलण्यात येत आहे. आपण पुन्हा आपली नोंदणी तपासून रुग्णालयात लसीकरणासाठी यावे म्हणून संदेश येत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे.

महापालिकेच्या भांडार विभागाला जिल्हा आरोग्य विभागाकडून करोना लशीचा साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पालिकेला लसवाटपाचे नियोजन करता येत नाही. शासनाकडून नियोजन स्वरूपात ठरावीक दिवशी पालिकेला लससाठा सध्या उपलब्ध होत आहे. हा साठा पालिका, खासगी रुग्णालयांना सम प्रमाणात वाटप करणे बंधनकारक आहे. लस घेणाऱ्यांची वाढती संख्या आणि लशीचा अपुरा पुरवठा यांमुळे तुटवडा जाणवत आहे, असे पालिकेच्या करोना लस भांडार विभागाचे संदीप प्रभुदेसाई यांनी सांगितले.

करोना लस प्राधान्याने पालिका रुग्णालयात येणाऱ्या रहिवाशांना देण्याचे नियोजन आहे. या नियोजनानंतर उरलेली लस खासगी रुग्णालयांमधील करोना लस केंद्रांना दिली जाते. नोंदणी केलेले रहिवासी, उपलब्ध लससाठा पाहूनच खासगी केंद्रांना लस दिली जाते. त्यामुळे खासगी रुग्णालयचालक त्यांच्याकडे असलेली लस पुरवून वापरतात. लसीकरणासाठी रहिवाशांची गर्दी वाढली आहे. केंद्रे वाढली आहेत. त्याप्रमाणात लससाठा उपलब्ध होत नसल्याने तुटवडा जाणवत आहे.

– डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी, कडोंमपा