दोन दिवसांत निविदा काढणार

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार असून या स्थानकाच्या आराखडय़ास रेल्वे विभागाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. मनोरुग्णालयाच्या जागा हस्तांतराबाबत आरोग्य विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी आतापर्यंतच्या बैठकींमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे जागा हस्तांतराचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून नव्या स्थानकाच्या परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कामांसाठी येत्या दोन दिवसात निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून ठाणे स्थानक ओळखले जाते. या स्थानकावर प्रवाशांचा वाढलेला भार कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेत नवे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गेल्या  दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात रेल्वेमंत्री आणि अधिकारी, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या सर्वाच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या आहेत. या बैठकांनंतर महापालिका प्रशासनाने नवे स्थानक उभारण्यासाठीचा आराखडा तयार केला होता.

या आराखडय़ास रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. त्यामुळे या स्थानकाच्या प्रस्तावास वेग आला आहे. असे असले तरी मनोरुग्णालयाच्या जागेवर हे स्थानक उभे राहणार असल्यामुळे त्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक आहे. या जागेच्या हस्तांतरणाबाबत आरोग्य विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागा हस्तांतरणाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच या जागा हस्तांतरासाठी महापालिकेने तीन पर्याय आरोग्य विभागाला सुचविले असून त्याबाबत आरोग्य विभागाकडे विचाराधीन आहे. त्यामुळे या तिन्हीपैकी एक पर्याय आरोग्य विभागाकडून लवकरच निवडला जाण्याची शक्यता असून नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने नवे स्थानक उभारणीच्या परिसरात प्रवासी सुविधा उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

११९ कोटींची कामे

नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या ११९ कोटी रुपयांच्या आराखडय़ास रेल्वे विभागाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. या आराखडय़ामध्ये नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांचा समावेश होता. याच कामांसाठी निविदा काढण्यात येणार असून ही कामे स्मार्ट सिटीच्या निधीतून केली जाणार आहेत. मनोरुग्णालयाच्या जागा हस्तांतराबाबत आरोग्य विभागाने यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या जागा हस्तांतराबाबत आरोग्य विभागाकडूनही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे.