बदलापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून, जमेल त्या तंत्राचा वापर करून उमेदवार मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच बदलत्या युगाला सलाम ठोकत पारंपरिक प्रचार तंत्राच्या बरोबरीनेच मतदार याद्यांचे सॉफ्टवेअर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, यू-टय़ुब आदी सोशल मीडिया साधनांमार्फत प्रचार होताना दिसत आहे. यात प्रामुख्याने बघायला मिळणारे चित्र म्हणजे उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांमध्ये पूर्वीप्रमाणे मतदार याद्या घेऊन बसलेल्या कार्यकर्त्यांऐवजी लॅपटॉप घेऊन बसलेले संगणकतज्ज्ञ दिसत आहेत.
या लॅपटॉपवर मतदार यादी पाहण्याचे सॉफ्टवेअर टाकले असून एका क्लिकवर नागरिकांना त्यांची नावे बघायला मिळत आहेत. आता या याद्यांची सॉफ्टवेअर मोबाइलमध्येही टाकता येत असल्याने ‘मोबाइल कार्यकर्ते’ प्रचाराला घरोघरी फिरताना मतदारांची नावे घरपोच कळवत आहेत. त्यामुळे मतदार नावांच्या पावत्या आता कालबाह्य़ होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच उमेदवार त्यांच्या ‘ई-प्रचारावर’ लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. मतदारांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर आपली बाजू मांडणारे संदेश, मतदानाचे आवाहन करणाऱ्या फलकाच्या डिझाइन्स वारंवार पाठवत आहेत. तर फेसबुकवर खास फेसबुक पानाची निर्मिती करून मतांचा जोगवा मतदारांकडे मागत आहेत.
संगणकतज्ज्ञांचा धंदा तेजीत
या निवडणुकांचे औचित्य साधून अनेक संगणकतज्ज्ञ उमेदवारांच्या घरांचे उंबरठे झिजवत असून, उमेदवारांना सोशल मीडिया व्यवस्थापनाच्या आकर्षक योजना सादर करत आहेत. यात यू-टय़ुब व व्हॉट्सअॅपसाठी चित्रफीत, संदेश पाठविण्यासाठी त्याच प्रभागातील मतदारांचे मोबाइल क्रमांक मिळवून देत आहेत. तर निवडणुकीनिमित्त लागणाऱ्या सॉफ्टवेअरची विक्री करत आहेत. या संपूर्ण व्यवस्थापनासाठी हे तज्ज्ञ उमेदवारांकडून चाळीस ते पन्नास हजार रुपये उकळत आहेत.

‘छपाई’ जोरात
उल्हासनगरमधील एका निवडणूक साहित्य छपाई करणाऱ्या दुकानदाराची यात चलती असून मतदार याद्या, अल्फाबेटिकल याद्या, याद्यांची सॉफ्टवेअर, अॅप्लिकेशन्स यात त्याने त्याची मक्तेदारी निर्माण केली असून, ठाणे शहर व जिल्ह्य़ात कुठेही निवडणुका आल्या, की सगळ्यात आधी याच्याकडे या याद्या मिळतात. स्थानिक प्रशासनाकडून याद्या मिळेपर्यंत याच्याकडे याद्या छापून तयार असतात. सगळ्यात आधी याच्याकडे याद्या मिळण्यात काय गौडबंगाल आहे, याचा पत्ता लागत नसला, तरी याची कमाई मात्र या काळात जोरदार होते.