राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, शेतकऱ्यांवर दुष्काळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी आपण इथे सण-उत्सव साजरा करणे योग्य नाही त्यामुळे तरुणांनी यंदा रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांमधूनही विद्यार्थ्यांना या विषयी जागृत करून जनजागृती करण्यात आली आहे.

जलजागृतीसाठी पथनाटय़
‘आला होळीचा सण लय भारी..चल पाणी वाचवूया..’ या गाण्यांच्या ओळी असलेले भित्तीपत्रके लावून विद्यार्थ्यांनी होळीनिमित्त जलजागृती केली. ठाणे रेल्वे स्थानक, तलावपाळी परिसरात पहायला मिळतील. पाणी वाचवण्याची जाणीव स्वत:ला आहे मात्र समाजाला जागृत करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी विधायक कार्य केले. समाजाला जागृत करायचे असल्यास प्रत्यक्ष समाजात जाऊन काही उपक्रम करायला हवेत, अशी चर्चा बांदोडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात काही दिवसांपूर्वी सुरू झाली. जलजागृती करण्यासाठी पथनाटय़ाचा आधार घ्यायचा असा एकमताने निर्णय झाला. आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तलावपाळीसारख्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पहायला मिळते. आला होळीचा सण लय भारी या घोषणांचे फलक घेऊन जलजागृती करणारे महाविद्यालयीन तरुणांनी या गर्दीचे लक्ष वेधून घेतले. होळी खेळण्यासाठी पाणी अपरिहार्य आहे असे सांगणाऱ्या तरुणाला पाण्याशिवाय आयुष्य कठीण आहे असे समजावणाऱ्या तरुणांचा संवाद सादर केलेल्या पथनाटय़ात पहायला मिळाला. सण साजरे करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होतो. पाण्यावर माणसाचे आयुष्य अवलंबून आहे. ही साधनसंपत्ती नष्ट झाली तर भविष्यात सण साजरे करण्यासाठी माणूस अस्तित्वात राहणार नाही, अशा आशयाचे पथनाटय़ बांदोडकर महाविद्यालयातील तरुणांनी ठाणे शहरात सादर केले. होळी सण साजरा करताना पाण्याशिवाय नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून कोरडी होळी साजरी करता येऊ शकते असा संदेश पथनाटय़ातून दिला गेला. सध्या सुरू असलेली पाणीटंचाई लक्षात घेता ठाण्यासारख्या मुख्य शहरात पाण्याची भीषण परिस्थिती आहे तर ग्रामीण भागात नक्कीच मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक भान न ठेवता होळी खेळण्यासाठी पाण्याची उधळपट्टी करणे चुकीचे ठरेल. हे नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी पथनाटय़ आणि भित्तीपत्रक प्रदर्शन सादर केले असल्याचे बांदोडकर महाविद्यालयाच्या आशिष धनगर याने सांगितले.

आधार संस्थेची सामाजिक कार्यातून ‘धूळवड’

‘आधार’ ही संस्था ठाणे शहरातील नेहा पारकर तसेच भांडुप येथे राहणाऱ्या सिद्धेश दळवी यांनी २६ मार्च २०१२ रोजी स्थापन केली. यावर्षी होळीनिमित्त २३ मार्च रोजी सायंकाळी भांडुप येथील वात्सल्य ट्रस्ट या अनाथाश्रमाला भेट देण्याचे या युवकांनी ठरविले आहे. त्या मुलांना पुरणपोळी तसेच खाऊ वाटप करण्यात येणार आहे. तसेच याच आश्रमात नर्सिग कोर्स शिकण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या तरुणींना पाण्याशिवाय होळी खेळणे तसेच नैसर्गिक रंगानी कसे तयार करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच या मुलांबरोबर छोटे छोटे खेळ खेळणार असून झाडांचे महत्त्व या विद्यार्थ्यांना पटवून देणार आहेत. १५-३० जणांनी यावर्षी पाण्याअभावी स्वत: रंग न खेळण्याचा निर्णय घेतला असून पाण्याचा वापर न करता जरी रंग खेळला तरीदेखील तो रंग काढण्यासाठी जास्त पाणी खर्ची होईल आणि हे टाळण्यासाठी रंगाचा फक्त एक टिळा लावूनच धूळवड साजरी करणार असल्याचे सांगितले. जल हे जीवन आहे असे सांगून त्यांनी जलसंवर्धनाची मोहीम रबविणार असल्याचे नमूद केले. कुठल्या गोष्टी केल्याने पाण्याचा वापर नियंत्रणात येऊ शकतो याचे मार्गदर्शनही ठाणे शहराजवळ असलेल्या गावात करणार असल्याचे नेहाने सांगितले आहे.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

जोशी बेडेकर महाविद्यालयाचा ‘चंद्रकोर’
परीक्षा संपलेल्या असल्यामुळे सुट्टीवर जाण्या आधी महाविद्यालयातील तरुण हा सण साजरा करून जातात. रंग खेळणे हे सर्वाच्याच आवडीचे आहे, परंतु यंदा राज्यात सगळीकडे दुष्काळ असताना आपण होळी-रंगपंचमी साजरी करणे योग्य नाही. काही जणांनी पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून कोरडी रंगपंचमी साजरी करणार आहेत. परंतु कोरडी रंगपंचमी खेळली तरी अंघोळ करण्यासाठी जादा पाणी लागणारच त्यामुळे यंदा आम्ही रंगपंचमीच न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्ष रंगपंचमी खेळली नाही तर आपल्या आनंदात काही कमी येत नाही. एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण यंदाचे सण साजरे करू.

वंदे मातरम संस्था

वंदे मातरम या तरुणांच्या समूहातर्फे दरवर्षी मोठय़ा उत्साहात होळी सण साजरा केला जातो. मात्र यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई असल्याने या संस्थेतील तरुणांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ज्या चौकात वंदे मातरम समूहाचे तरुण मोठय़ा उत्साहात धूळवड करतात त्या चौकात पाण्याचा अपव्यय टाळा असा संदेश देणारे फलक लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या ११ हजार गावांमध्ये दुष्काळाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना आपण रंगपंचमीसाठी लाखो लीटर पाणी वाया घालवू शकतो का? सामाजिक बांधीलकी जपत केवळ प्रतीकात्मक रंगपंचमी साजरी करून पाण्याची बचत करा अशा विनंतीचा संदेश व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वत्र पोहचवण्यासाठी तरुण प्रयत्नशील आहेत, असे वंदे मातरम संस्थेचे सुभाष एरंडे यांनी सांगितले.

जनसेवा प्रतिष्ठानतर्फे स्वाक्षरी मोहीम

ठाणे जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र मिळून ‘जनसेवा प्रतिष्ठाना’च्या साहाय्याने समाज जागृतीचे काम करतात. ही तरुण मंडळी होळी सणाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील तलावपाळी, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवली रेल्वे स्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी सर्व सामान्य जनतेकडून पाणी बचतीसाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करणार आहेत. तसेच रंगपंचमी हा सण रंगाचा असून, त्यामध्ये पाण्याचा वापर करू नका असाही संदेश यावेळी देण्यात येणार आहे. तसेच जन सामान्यांकडून त्यांच्या होळीच्या संकल्पना एका फलकावर लिहिण्याचे आवाहनही यावेळी करण्यात येणार आहे.

ईमकॉस्ट महाविद्यालयाचा ‘जागर जलाचा’
दैनंदिन जीवनातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी इमकॉस्ट महाविद्यालयातर्फे जागर जलाचा या पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या पथनाटय़ामध्ये खराब अथवा तुटलेल्या नळातून वाया जाणारे लाखो लीटर पाणी वाचविण्यासाठी गळणारे नळ ताबडतोब आपल्या जवळील अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देणे, हॉटेलमध्ये पाण्याचा योग्य तेव्हढाच वापर करावा, असा संदेश या पथनाटय़ामधून देण्यात आला. प्रत्येक कुटुंबाने काटकसरीने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर केल्यास किमान ५० लीटर पाणी वाचवता येणे शक्य आहे हे पथनाटय़ाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. होळीच्या निमित्ताने होणाऱ्या पाण्याचा गैरवापर टाळावा. हा सण केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित ठेवावा. असेही यामध्ये मांडण्यात आले आहे. पाणी हे आपले जीवन आहे. तेच जर संपुष्टात आले तर, आपल्याला जगणे अशक्य होईल. आता पाण्याच्या बाबतीतला हलगर्जीपणा सोडा, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत-जास्त कामे करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश या पथनाटय़ातून ठाणेकरांना देण्यात येणार आहे.

कोरडी होळी खेळू..
होळी हा सण आनंद साजरा करण्यासाठी असतो. दुष्काळ असो वा नसो विनाकारण पाण्याची नासाडी करणे हे चुकीचे आहे, असे मी समजतो. सध्या तर एक थेंबही वाय घालवणे आपल्याला परवडणारे नाही, त्या पाश्र्वभूमीवर येणारी प्रत्येक रंगपंचमी मी कोरडी साजरी करणार अशी मी शपथ घेतो. माझ्या आसपासच्या लोकांनाही कोरडी होळी खेळण्याचे आवाहन मी करणार आहे.
– अभिजित केळकर, ठाणे.

मी खेळणार ‘जागरुकतेची’ रंगपंचमी
रंगपंचमी खेळण्याएवजी त्यावेळी होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यामातून रंगपंचमीसंबंधी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा मी निश्चय केला आहे. या वर्षी आपल्या राज्यावर पाणीकपातीचे महाभयंकर संकट ओढवले असताना लोकांमध्ये पाण्यासंबधी जागरूकता निर्माण करण्याला मी प्रथम प्राधान्य देईन, यंदाची रंगपंचमी मी जनजागृतीसाठी सार्थकी लावणार आहे.
– भक्ती शेटय़े, ठाणे.

रंगपंचमी नको..
एकीकडे पाण्याची कमतरता तर दुसरीकडे गळल्या जलवाहिन्यातून होणारी पाण्याची नासाडी याविषयीचे वृत्त आपण वृत्तपत्रातून वाचत होतो. नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल पाहता आपणही जागृत झाले पाहिजे. यासाठी महाविद्यालयीन तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली. सध्या महाविद्यालयाला सुट्टी लागली आहे, त्यामुळे महाविद्यालय परिसरात कोणी रंगपंचमी साजरी करणार नाही. परंतु विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमीही साजरी करू नये.
– किशोरी भगत उपप्राचार्य, प्रगती महाविद्यालय, डोंबिवली.

कुटुंबीयांसोबत पाण्याविना होळी..
महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहता यंदाची माझी होळी पाण्याचा वापर न करणारी असणारच आहे. याशिवाय माझ्या कुटुंबासह मित्रमैत्रिणींसह सामाजिक भान राखत पाणीविरहित अशी होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आमच्यासारखी पाणीविरहित होळी खेळण्यासाठी विनंती करत आहोत. याबद्दल जनजागृती करणार आहोत.
– वैभव शंकपाळ, ठाणे.

सुक्या रंगांनी होळी साजरी करणार
आपल्या संस्कृतीत असणारे सण साजरे करायला प्रत्येकालाच आवडतात. होळीच्या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पाणी आणि रंग यांची उधळण करत होळी साजरी करण्याची मजा काही वेगळी असते. मात्र या वर्षीची पाणीटंचाई लक्षात घेता या वर्षीची होळी पाण्याचा वापर टाळून सुक्या रंगानी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. होळी म्हणजे फक्त पाण्याचा वापर करणे एवढेच नाही तर पाण्याचा अपवव्य टाळूनदेखील होळी साजरा करता येते याची जाणीव या निमित्ताने पुढच्या पिढीला होईल अशी आशा आहे.
– सुभाष एरंडे, ठाणे.

(संकलन – किन्नरी जाधव, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, शर्मिला वाळुंज)