डोंबिवलीतील डॉक्टरांचा उपक्रम

घरातील स्त्री निरोगी असेल तर घरही सुदृढ राहते, असे म्हणतात. बदलत्या काळाप्रमाणे महिलांचे आरोग्य जपण्यासाठी डोंबिवली येथे फक्त महिलांसाठी एक रुग्णालय सुरू  करण्यात आले आहे. या रुग्णालयातर्फे दरमहा एक विनामूल्य शिबीर महिलांसाठी आयोजित करण्यात येणार असून त्यांच्या आरोग्याची सवरेतोपरी काळजी घेणे हे या रुग्णालयाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

दैनंदिन जीवनात महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. मात्र कामात व्यस्त असल्याने त्याकडे त्या दुर्लक्ष करतात. या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र केंद्र असावे, अशी कल्पना डॉ. जयश्रीकृष्णन यांना सुचली. त्यांनी ती डॉ. कुमार यांना सांगितली. शहरातील इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने ही कल्पना त्यांनी आता प्रत्यक्षात राबवली आहे.

‘वुमेन हेल्थ, फॅमिली वेल्थ’ ही टॅगलाइन असणाऱ्या या रुग्णालयात मुलगी वयात येण्यापासून ते वयोवृद्ध महिलांची काळजी या रुग्णालयात घेतली जाणार आहे. डोंबिवली शहरातील अनेक डॉक्टरांनी या उपक्रमात सहकार्याचा हात पुढे केला आहे.

विशेष म्हणजे परिचारिकांपासून ते डॉक्टरांपर्यंत जास्तीत जास्त महिलांचा वावर या रुग्णालयामध्ये पाहायला मिळतो. तसेच मेमोग्राफी, स्त्रियांना पीडीओसी रोगामुळे होणारे स्किन प्रॉब्लेम्ल्स याचीही सोय या दवाखान्यात उपलब्ध असून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच महिलांचे महत्त्व प्रत्येकालाच कळावे यासाठी एक महिला काय करू शकते हे वर्णन करणारे शब्द लिहिले गेले आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून ३० वर्षांवरील वयाच्या पहिल्या शंभर महिलांच्या हाडांची विनामूल्य चिकित्साही येथे केली जाईल. डोंबिवलीत पूर्व विभागात रेल्वे स्थानकालगत हे रुग्णालय आहे.