संचारबंदीतही नागरिकांच्या मुक्तसंचारामुळे निर्णय

 

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केल्यानंतरही मुंब्रा शहरात नागरिकांची वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी कायम आहे. अखेर नागरिकांच्या या मनमानीला कंटाळून ठाणे पोलिसांनी मुंब्रा शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीला पाचारण केले आहे. या तुकडीतील जवान ठाणे पोलिसांच्या मदतीने शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी कारवाया करणार आहेत. त्यामुळे मुंब्र्याय़ातील गर्दीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारकडूनही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच गर्दी करू नये अशा सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्य़ातील करोना बाधितांचा आकडा वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात असताना मुंब्रा शहरात मात्र, काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना आणि तसेच गर्दी करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून वारंवार नागरिकांना गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे. मात्र पोलिसांच्या या आवाहनाला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी आता राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीला मुंब्रा शहरात पाचारण करण्यात आले आहे. या तुकडीत १०० जवान असून मुंब्रा शहरातील विविध भागात त्यांना बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहे. यामुळे मुंब्रा शहरातील नागरिकांना शिस्त येईल असे बोलले जात आहे.