लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील टंडन रस्त्यावर रात्रीच्या वेळेत दत्तनगरमधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेवर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात ही परिचारिका जखमी झाली आहे.

याच भागात भटक्या कुत्र्यांनी महिनाभरात अशा प्रकारे रात्रीच्या वेळेत सहा ते सात पादचाऱ्यांना जखमी केले आहे, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. डोंबिवली रेल्वे स्थानक, मासळी बाजार आणि मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळेत भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. डोंबिवली पूर्वेत फडके रस्ता, सावरकर रस्ता, टिळक रस्ता, मानपाडा रस्ता, टंडन रस्ता, आयरे रस्ता, पश्चिमेत विष्णूनगर मासळी बाजार, फुले रस्ता, दीनदयाळ रस्ता, कोपर रस्ता, गुप्ते, सुभाष रस्ता भागांत कुत्र्यांच्या टोळय़ा रात्रीच्या वेळेत रस्त्यावर असतात. या टोळ्यांमधून वाट काढत जाणे अनेक प्रवाशांना विशेषत: रात्रीच्या वेळेत पायी जाणाऱ्या महिलांना त्रासदायक होत आहे.

दोन दिवसांपूर्वी दत्तनगरमधील एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका रात्रीच्या वेळेत टंडन रस्त्याने जात होती. अचानक पाच ते सहा कुत्री या महिलेच्या अंगावर धावून गेली. जवळील पर्सच्या साहाय्याने तिने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुत्र्यांनी दाद दिली नाही.

या हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे. याच रस्त्याने जात असलेल्या काही वाहनचालकांनी वाहन थांबवून या महिलेची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. असेच प्रकार रात्रीच्या वेळेत टंडन रस्त्यावर वारंवार होत असतात. टाळेबंदीच्या सात ते आठ महिन्यांच्या काळात पालिकेकडून येणारे भटके कुत्रे पकडणारे पथक अलीकडे येत नाही. या पथकाने कुत्री पकडून नेली की भटक्या कुत्र्यांची शहरातील संख्या कमी होते. भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्याची मागणी होत आहे.