|| भगवान मंडलिक

खराब कामांची देयके न देण्याचा कल्याण-डोंबिवली महापालिकेचा निर्णय :- डोंबिवली पश्चिमेतील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या १९ प्रभागांमधील रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने संबंधित ठेकेदारास या कामांची देयके न देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्तेदुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागाच्या हद्दीत १९ प्रभाग आहेत. या प्रभागातील रस्ते देखभाल, खड्डे भरण्याची कामे मे. भारत उद्योग ठेकेदाराला देण्यात आली होती. सुमारे दोन कोटी रुपयांत पावसात पडणारे खड्डे भरणे, खराब रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरणाची कामे ठेकेदाराने करणे आवश्यक होते. वेळोवेळी ही कामे करण्यात आली. मात्र सततचा पाऊस आणि त्यामुळे पडणारे खड्डे यामुळे ठेकेदाराचा खर्च दोन कोटींपेक्षा अधिक झाला. प्रत्यक्षात काम दोन कोटी रुपयांचे असताना कामाचा खर्च अधिक झाल्याने ठेकेदाराने ह प्रभागातील बांधकाम अधिकाऱ्यांकडे नियमित देयकासह वाढीव खर्च देण्याचा आग्रह धरला.

खड्डय़ांमुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे चांगले बांधकाम साहित्य वापरून खड्डे सुस्थितीत केले जावेत असा आग्रह अभियंता विभागाने धरला होता. असे असताना ठेकेदाराने खड्डे भरणी व्यवस्थित न केल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण न करताच कामे उरकण्यात आली होती. हा सविस्तर अहवाल अभियंता गुप्ते यांनी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना पाठविला होता. याशिवाय दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाकडूनही या रस्त्यांची तपासणी करण्यात आली. या विभागांकडून आलेल्या अहवालानंतर ठेकेदाराने केलेली सर्व निकृष्ट रस्ते कामे फेटाळण्यात आली. या कामांचे एकही देयक आपणास दिले जाणार नाही. पालिकेने खड्डे भरण्याची, रस्ते पुनर्पृष्ठीकरणाची विहित केलेली कार्यपद्धती ठेकेदाराने अवलंबली नाही, असा ठपका कोळी यांनी ठेकेदाराला दिलेल्या नोटिसीत ठेवला आहे. तसेच ठेकेदारास काळय़ा यादीत टाकण्याची तंबीही देण्यात आली आहे.

ठेकेदारावरील आक्षेप डांबरीकरण करण्यापूर्वी रस्त्यांची सफाई केली नाही. निविदेतील तरतुदीनुसार टॅक कोट मारला नाही. डांबराचा दर्जा कमी प्रतवारीचा. डांबरीकरणाच्या मिश्रणामध्ये डांबराचे प्रमाण मानांकनापेक्षा कमी. रस्ते डांबरीकरणाची जाडी कमी असल्याने रस्ता समतल पातळीत केला गेला नाही. या ठिकाणी दुचाकी घसरून अपघाताची शक्यता.

डोंबिवली पश्चिमेतील ठेकेदाराने निविदेतील अटीशर्तीप्रमाणे रस्ते देखभालीची कामे केली नाहीत. निकृष्ट दर्जाची कामे फेटाळण्यात आली आहेत. त्या कामांचे देयक अदा केले जाणार नाही. या रस्त्यांवर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची असेल. – सपना कोळी, शहर अभियंता