ठाण्यातील बी-केबिन विभागातील इमारत कोसळली आणि स्ट्रक्चरल ऑडिट हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मुळात स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य असावे का, हे ऑडिट रहिवाशांनी स्व-खर्चाने करावे, की महापालिकेने करावे, महापालिकेने हा भार का उचलावा, असे अनेक प्रश्न या संदर्भात विचारले जात आहेत. या प्रश्नाकडे जाण्याआधी मुळात स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय हे नीट समजून घेऊ या. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारतीचे संरचनात्मक परीक्षण. मात्र ही संकल्पना आणि शब्द दोन्ही नवीन असल्याने त्यातून पूर्ण अर्थ स्पष्ट होतो असे वाटत नाही.माणसाच्या आयुष्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून वयाच्या चाळिशीनंतर सर्व आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात, असे डॉक्टर सांगतात, कारण वेगवेगळ्या व्याधींची सुरुवात याच सुमारास होण्याची शक्यता असते, परंतु त्याआधीच्या वयात कोणत्याच चाचण्या करून घ्यावा लागत नाहीत, असे नाही. कारणपरत्वे वेळोवेळी डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करून योग्य ती औषधे आपण घेत असतो. जसे आपले आरोग्य असते, तसेच इमारतीचेही. सर्वसाधारणपणे २५ ते ३० वर्षांनंतर सर्व इमारतींचे परीक्षण करून घ्यावे, असे मानायला हरकत नाही; परंतु सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम क्र. ७७ प्रमाणे संबंधित सोसायटी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट हे १५ वर्षांनंतर करणे आवश्यक आहे. इमारतीचे उत्तरायुष्य सुदृढ आणि चांगले जावे, हा त्यामागचा हेतू आहे. (इमारतीचे आयुष्य म्हणजे काय आणि किती याविषयी पुढच्या लेखात स्वतंत्र आढावा घेऊ.) सध्या तरी इमारतीचे ‘ऑडिट’ म्हणजे नेमके काय करायचे हे स्पष्ट करणारी कोणतीही सरकारी नियमावली नाही. मात्र इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनीअर्स या व्यावसायिकांच्या संघटनेने मुंबई महापालिकेला २००९ मध्ये या संदर्भात काही सूचना केल्या होत्या. त्यावरून मुंबई महापालिकेने ‘प्रोफार्मा बी’ तयार केला असून तो बऱ्याच अंशी परिीाूर्ण आहे, असे मानायला हरकत नाही.साधारणपणे ऑडिट रिपोर्टचे ‘सात’ भाग करता येऊ  शकतील. त्यातील पहिला भाग म्हणजे प्राथमिक माहिती- त्यात इमारतीचे नाव, पत्ता, एकूण मजले, वापराचा प्रकार (निवासी की वाणिज्य), बांधकामाचा प्रकार आदी गोष्टी नमूद केलेल्या असतात. बांधकामाच्या पद्धतीमध्ये लोड बेअरिंग, आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर, स्टील फ्रेम्स स्ट्रक्चर्स, मिक्स टाइप स्ट्रक्चर्स आदी प्रकार असतात. दुसऱ्या विभागात इमारतीच्या डागडुजीचा तपशील नोंदविलेला असतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही सोसायटीकडे अथवा मालकाकडे या संदर्भातील माहिती नीटपणे नोंदवून ठेवलेली आढळून येत नाही. मात्र ही माहिती उपलब्ध असल्यास संरचनात्मक परीक्षण करण्यास तिचा निश्चितच उपयोग होतो. त्याचप्रमाणे इमारतीची आर्किटेक्चरल आणि स्ट्रक्चरल दोन्ही ड्रॉइंग असणे आवश्यक असते. नसल्यास ती नव्याने करून घेणे आवश्यक आहे. ही नसताना केलेल्या ऑडिट व दुरुस्तीच्या खर्चाच्या अंदाजाला मर्यादा पडतात. तिसऱ्या भागामध्ये बाहय़ निरीक्षणाचा समावेश होतो. त्यामध्ये बाहेरचे प्लास्टर (गिलावा), प्लम्बिंग, ड्रेनेज लाइन्स, इमारत सोडून असलेली मोकळी जागा व त्याचा वापर या संदर्भात पाहणी करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे इमारत कलली आहे का? बाल्कनी, सज्जे, कठडे झुकले आहेत का? इमारतीचा एखादा भाग कोसळून इजा होण्याची शक्यता आहे का? हे बघणे आवश्यक आहे. मात्र जमिनीवर उभे राहून सर्व मजल्यांची निरीक्षणे करण्याला अन्य पर्याय नाही. काही वेळा दुर्बिणीतून, शेजारील इमारतीतून अथवा खिडकीच्या बाहेर येऊन (सोय असल्यास) इमारतीचे निरीक्षण करता येते. परदेशात ‘इन्फ्रारेड थर्माग्राफी’ कॅमेराच्या साहाय्याने निरीक्षणे नोंदविता येतात. मात्र आपल्याकडे अद्याप ही पद्धत रूढ झालेली नाही.चवथ्या भागात अंतर्गत निरीक्षण येते. सर्वप्रथम इमारतीच्या मूळ आराखडय़ात इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हानीकारक बदल केला आहे का हे बघणे महत्त्वाचे आहे. तसेच इमारतीच्या आतील खोल्यांमधला गिलावा, दरवाजा-खिडक्यांची स्थिती, भिंतींमधील भेगा आणि ओलावा, न्हाणीघर-शौचालयातील गळती इ. गोष्टींची पाहणी होते. त्याचप्रमाणे खांब (कॉलम), तुळया (बीम) आणि छत (स्लॅब) यांच्यातील पोलादी सळ्यांना गंज चढलाय का, त्याला भेगा पडल्यात का, त्याला बाक आलेत का, फरश्यांना भेगा पडल्यात का, त्या खचल्या आहेत का, छतावरील वॉटरप्रूफिंग व्यवस्थित झाले आहे का, पाया खचतोय का इ. गोष्टीही तपासल्या जातात.पाचव्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) चा समावेश होतो. ज्या प्रकारे आपण डॉक्टरांकडून आपल्या निरनिराळ्या व्याधींसंदर्भात पॅथॉलॉजिकल टेस्ट करून घेतो, त्याच प्रकारे इमारतींची प्रकृती तपासण्यासाठी काही प्रकारच्या (‘एनडीटी’) चाचण्या उपलब्ध आहेत.अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट, रिबाऊंड हॅमर टेस्ट, हाफसेल पोन्टॅशियल टेस्ट, कॉम्बिनेशन डेप्थ टेस्ट आणि कोअर टेस्ट या त्यातील काही महत्त्वाच्या चाचण्या आहेत. गरज पडल्यास काँक्रीटचे नमुनेही परीक्षणासाठी पाठविता येतात. या चाचण्यांवरून इमारतीच्या ताकदीविषयी किंवा इन्ट्रीग्रीटीविषयी काही आडाखे बांधताना येतात. वरील सर्व निरीक्षणांची सविस्तर नोंद नकाशावर करावी लागते. त्याला डिस्ट्रेस मॅपिंग प्लॅन असे म्हणतात. त्यामुळे इमारतीच्या कोणत्या भागाला नेमकी कशा प्रकारची इजा झाली आहे, त्याची व्याप्ती किती आहे याची एक नोंद तयार होते. सहाव्या भागात, प्रकाराची पाहणी, नोंदी, निरीक्षणे आणि चाचण्यांनंतर इमारतीच्या दुरुस्तीची शिफारस करता येते. त्या शिफारशी साधारण पुढील प्रकारच्या असतात.इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब व इतर आर.सी.सी. घटकांना दुरुस्त किंवा मजबूत करून घेणे, नव्याने वॉटर-प्रूफिंग करून घेणे, बाहेरून पुन्हा गिलावा (प्लास्टर) करणे, त्याचप्रमाणे दुरुस्ती करताना घ्यावयाची काळजी. उदा. मुंडे लावणे, इमारत अंशत:/किंवा पूर्ण खाली करून घेणे इत्यादी सूचनांचा त्यात अंतर्भाव असतो.या सर्व चाचण्यांवरून निरीक्षकांनी निश्चित स्वरूपाचे काही अनुमान द्यावे, अशी अपेक्षा आहे. त्यात मुख्य म्हणजे इमारत राहण्यायोग्य आहे की नाही? ती तातडीने अंशत: किंवा पूर्णत: खाली करावी का? काही धोकादायक भाग पाडून टाकावा का? इमारत तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे का? इमारत धोकादायक आहे का? अशा गोष्टींचा त्यात उल्लेख असतो.सातव्या भागात निरीक्षक त्यांचे अभिप्राय देतो. तो चार प्रकारांत असू शकतो, त्यात पहिला प्रकार म्हणजे इमारत तातडीने खाली करून पाडून टाकावी. दुसरा प्रकार म्हणजे तातडीने रिकामी करून दुरुस्त करावी. तिसऱ्या प्रकारात इमारत रिकामी करण्याची आवश्यकता नाही, पण दुरुस्त करावी आणि चौथा अभिप्राय म्हणजे किरकोळ दुरुस्ती करावी.
संरचनात्मक परीक्षणाच्या मर्यादा
अर्थातच या अहवालाला काही मर्यादा आहेत. याचे कारण म्हणजे परीक्षणातील बहुतेक निष्कर्ष केवळ निरीक्षणावर (व्हिज्युअल इन्स्पेक्शन) आधारित असतात. त्यामुळे ते बऱ्याच अंशी ढोबळ आणि प्राथमिक आडाखे असतात. इमारत भूकंपनिरोधक आहे की नाही, हे डिझाईन कॅल्क्युलेशन पाहूनच व अभ्यास करून सांगता येते. जमिनीखालील इमारतीच्या भागांची माहिती मिळणे शक्य नसते. छताखाली ज्या भागाचे फॉलसिलिंग झालेले आहे, त्याचे निरीक्षण करता येत नाही. तसेच भिंतीवरील कपाटे, डेकोरेटिव्ह फरशा (टाइल्स) यांच्या मागील भागाचे निरीक्षण करता येत नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अनेकदा निरीक्षणासाठी आलेल्या इंजिनीअर्सना घरामध्ये (सदनिकेत) प्रवेश नाकारला जातो. उंच इमारतींची बाहेरून केलेली निरीक्षणे अपुरी असतात. या सर्व मर्यादांमुळे हा अहवाल परिपूर्ण नसला तरी त्यातून संभाव्य धोक्याची सूचना मात्र निश्चित मिळते. हे ऑडिट आपण राहत असलेल्या ‘आपल्याच’ इमारतीचे असल्याने ते जरूर करून घ्यावे आणि त्यातील सर्व सूचनांची लवकरात लवकर कार्यवाही करावी.

(पुढील लेखात इमारतींचे आयुष्य, आरोग्य आणि उपाययोजना)

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Bank dispute in private building is in police case filed against Canara Bank management
खाजगी इमारतीतील बँकेचे भांडण पोलिसात, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

जयंत कुलकर्णी व्यवस्थापकीय संचालक, इपिकॉन्स कन्सल्टंट्स प्रा. लि. 

(स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत)