पूर ओसरल्यानंतर कल्याण, बदलापुरातील घरांची वाताहत समोर; साफसफाईसाठी पूरग्रस्तांची धावपळ

कल्याण, बदलापूर : पाणी ओसरले तरी घरात सर्वत्र झालेला चिखल, अस्ताव्यस्त पडलेले सामान, पसरलेली दरुगधी.. हे चित्र होते कल्याण, बदलापूर, भिवंडी शहरांतील पूरग्रस्त कुटुंबांचे घरातील. पुराचे पाणी घरामध्ये शिरल्यानंतर गुरुवारी अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. मात्र शुक्रवारी पाणी ओसरल्यानंतर घरातील नासधूस पाहून अनेकांच्या डोळय़ांत अश्रू तरळले. मात्र खचून न जाता कोलमडलेला संसार नव्याने उभा करण्यासाठी पूरग्रस्त कुटुंबांनी धडपड सुरू केली आहे. घर आणि परिसरातील साफसफाई करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे गुरुवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर, कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा आणि शहाड भागांत मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. पाणी वाढू लागल्याने प्रशासन आणि काही सामाजिक संस्थांकडून नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती, तर काही जणांनी नातेवाईकांच्या घरी, टेम्पोसारखी वाहने या ठिकाणी आसरा घेतला होता. गुरुवारी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी पाणी ओसरले होते. मात्र पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे सायंकाळी कुणीही घरी परतले नव्हते. शुक्रवारी सकाळीच नागरिकांनी आपल्या घराकडे धाव घेतली. अनेकांच्या घरात चिखलचा थर साचला होता. पुराच्या पाण्यामुळे घरातील फर्निचर आणि सामानाची नासधूस झाली होती. पुराच्या पाण्यामुळे दरुगधी पसरली, तर घरात किडेही आल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले.

घराची ही अवस्था पाहून शुक्रवारचा पूर्ण दिवस अनेकांनी साफसफाई करण्यात घालवला. अनेक अन्नधान्य आणि स्वयंपाकघरातील इतर जिन्नस भिजल्याने फेकून देण्याची वेळ आली. विद्युत उपकरणांमध्ये पाणी गेल्याने त्यांच्यात बिघाड झाला. बदलापुरातील अनेकांनी बुधवारी रात्रीच आपले मौल्यवान साहित्य, कागदपत्रे आपल्या नातेवाईक आणि वरच्या मजल्यावरील शेजाऱ्यांच्या घरी हलवले. नदीकाठच्या काही नागरिकांनी मध्यरात्रीच शहरातील उंचावरच्या ठिकाणी आपली चारचाकी वाहने नेऊन उभी केल्याने दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीपेक्षा यंदा कमी नुकसान झाल्याचे दिसून आले.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ४ ऑगस्ट २०१९ रोजी पुरात अशा प्रकारे नागरिकांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. त्या वेळी महसूल विभागाने नुकसानभरपाईचे अर्ज भरून घेतले; परंतु शासनाकडून एक पैशाची मदत मिळाली नसल्याचा आरोप कल्याणमधील नागरिकांनी केला. घरामध्ये दरुगधी पसरली असून घर र्निजतुक केल्याशिवाय राहता येणार नाही, असे या नागरिकांनी सांगितले.

शहाड, घोलपनगर, टिटवाळा, विठ्ठलवाडी, गंधारे, बारावे या भागांतील अनेक गृहसंकुलांच्या पहिल्या माळ्यापर्यंत पाणी लागले होते. तळमजला, पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या रहिवाशांचे साहित्य पुराच्या पाण्यात भिजले होते. अनेकांची वाहने पुराच्या पाण्यात बुडाली होती. या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील दीड वर्षांपासून करोना प्रादुर्भावामुळे अनेक घरांमधील रहिवाशांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मिळेल ते काम करून मजुरी करून ते घरगाडा चालवीत आहेत. अशा परिस्थितीत पुराचा फटका बसल्याने नागरिकांपुढील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शासनाने मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांना मदत

कल्याण, डोंबिवली परिसरांतील पूरग्रस्त नागरिकांना स्थानिक सामाजिक संस्था, दाते यांनी भोजन, निवासाची व्यवस्था केली होती. गुरुवार दुपारपासून सुमारे पाच ते सहा हजार भोजन पाकिटांचे पालिकेतर्फे वाटप करण्यात आले. अनेकांच्या घरातील वीजपुरवठा बंद आहे. घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. अशा नागरिकांची गैरसोय होऊन नये म्हणून पालिका, सामाजिक संस्था, दात्यांनी विविध भागांत भोजन कक्ष सुरू केले. शुक्रवारीही या रहिवाशांना भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले.

धूरफवारणी

कल्याण, डोंबिवली शहरांत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाहून आलेल्या गाळाने रोगराई पसरू नये म्हणून घनकचरा तसेच आरोग्य विभागाने शहराच्या विविध भागांत धूर, जंतूनाशक फवारणी सुरू केली. नागरिकांनी नासधूस झालेले साहित्य रस्त्यावर, कचराकुंडीच्या ठिकाणी फेकू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. नासाडी झालेले, कुजलेले साहित्य एका ठिकाणी जमा करण्याबाबत नागरिकांना कळवावे आणि त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी ते साहित्य उचलावे, अशी सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.

पाण्यासाठी धावाधाव

गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागांत पालिकेकडून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांवर टँकरसाठी गर्दी केली होती. घरसफाईसाठी नागरिक पावसाचे पाणी वापरत होते. पालिकेची मोहिली, मोहने येथील उदंचन केंद्रे पाण्याखाली गेल्याने पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवला होता. शुक्रवारी सकाळी डोंबिवली, कल्याण शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

बदलापूरमध्ये स्वच्छता मोहीम

पुराचे पाणी ओसरल्यानंतर शुक्रवार सकाळपासूनच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या यंत्रणांनी स्वच्छतेचे काम सुरू केले, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली. रस्त्यावरील चिखल, कचरा, साहित्य तसेच अडथळा दूर करण्यासाठी १० जेसीबी, आठ डम्पर वाहने दिमतीला होती. रस्ते साफसफाई तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी १० टँकरची व्यवस्था करण्यात आली. पूरग्रस्त प्रभागांमध्ये औषध फवारणी केली जात आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पालिकेकडून गुरुवारपासूनच दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. पूरस्थितीचा आढावा घेतला जात असून पुराच्या पंचनामे करण्यासाठी १० पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.

वीजपुरवठय़ाच्या समस्या

पुराचे पाणी शिरलेल्या भागातील विद्युतपुरवठा महावितरणने गुरुवारी बंद केला होता. पाणी ओसरल्यानंतर हा पुरवठा पूर्ववत करण्यात आला. काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर घरातील वीजप्रवाह सुरू करताना विजेचा धक्का लागणे, उच्च दाबाने प्रवाह येऊन घरातील फ्रिज, टीव्ही जळणे असे प्रकार सुरू झाले आहेत. शहाड भागातून अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत.