अभिनेत्री अश्विनी कासारचे मत
नाटक, मालिका या क्षेत्रांत येणाऱ्या तरुण पिढीकडे सावधगिरी व सकारात्मक दृष्टिकोन तसेच सदसद्विवेकबुद्धी हवी. स्वतवर विश्वास आणि ध्येयाकडे लक्ष ठेवल्यास या बाबी शक्य आहेत, असे प्रतिपादन कमला या मालिकेतील शीर्षक अभिनेत्रीची भूमिका करणाऱ्या अश्विनी कासार हिने केले. प्रतिभावंत बदलापूरकर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी रविवारी सायंकाळी घेतलेल्या मुलाखतीच्या दरम्यान अश्विनीने दिलखुलासपणे रसिकांशी संवाद साधला. या वेळी पुढे अश्विनी म्हणाली की, घरात कलासक्त वातावरण असल्याने कलेची आवड लहानपणापासूनच लागली होती. तसेच बदलापुरातील आदर्श शाळेत शिकताना शिक्षकांनी केलेल्या संस्कार व मार्गदर्शनाचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला होता असे तिने आवर्जून नमूद केले.
सुरुवातीला नाटय़क्षेत्रासाठी काम करताना पंकज चेंबूरकर व मृणाल चेंबूरकर या दाम्पत्याकडून नाटय़क्षेत्रासाठीचे मार्गदर्शन मिळाले तर स्वप्निल धोत्रे यांच्याकडून नृत्यकेलेचे धडे मी घेतले. या वेळी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा तिने कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. रुईया महाविद्यालयाबद्दल सांगताना ती म्हणाली की, रुईया महाविद्यालयातले दिवस खूप भारलेले आणि मंतरलेले होते. कलाकार म्हणून मला खऱ्या अर्थाने रुईयानेच घडविले.
..आणि कमलासाठी निवड झाली
कमला या शीर्षक भूमिकेसाठी मी ५ ते ६ वेळा ऑडिशन्सला गेले होते. कमला साकारणे मोठे आव्हान होते. त्यामुळे मूळ नाटकांचं वाचन केलं आणि हिंदी चित्रपटही पाहिला. या तयारीनंतर कमला मालिकेची शीर्षक अभिनेत्री म्हणून माझी निवड झाली. या वेळी दिग्दर्शक अजय मयेकर यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यातील कमला खुलत गेली. सध्या ही कमला माझ्यात इतकी भिनली असून घरी अथवा बाहेर बोलतानाही तोंडून कमला मालिकेतल्या संवादांप्रमाणेच शब्द बाहेर पडतात. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वृत्तनिवेदक भूषण करंदीकर यांनी केले.