कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या समर्थक नेत्यांना निर्णय प्रक्रियेपासून लांब ठेवण्याची रणनीती यंदा भाजपने आखली आहे. उमेदवारांची निवड करताना गटातटाच्या राजकारणात मग्न असलेल्या स्थानिक नेत्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवून सुशिक्षित उमेदवारांच्या निवडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातले असून, खासदार कपिल पाटील यांना यासंबंधीच्या थेट सूचना करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. हे करत असताना इतकी वर्षे कल्याण-डोंबिवलीत पक्षीय आखणीत वरचष्मा राखणारे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार तसेच उपमहापौर राहुल दामले यांना मात्र निर्णय प्रक्रियेत फारसे स्थान देण्यात आलेले नाही.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे समर्थक म्हणून येथील राजकीय वर्तुळात वावरणारे काही नेते निवडणुकीदरम्यान गटातटाचे राजकारण खेळत असल्याच्या तक्रारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचल्या आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे गटाचे प्राबल्य कमी करून गुजराती, संघ परिवारातील उमेदवारांचा प्राधान्याने विचार करा, अशा सूचना खासदार कपिल पाटील यांना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महापालिका निवडणुकीची सूत्रे भाजपने भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या हाती सोपवली आहेत. पाटील हे आगरी समाजातील आहेत. आमदार किसन कथोरे यांचे आगरी, मराठा समाजाशी स्नेहाचे संबंध आहेत. कल्याण-डोंबिवलीतील समाज घटकांशी या दोघांचे असलेले नातेसंबंध पाहता त्यांना या निवडणुकीत सक्रिय करण्याचा निर्णय भाजपने वरिष्ठ पातळीवरून घेतला आहे.