कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात; कर भरण्यासाठी येणारे नागरिक ताटकळत

अंबरनाथ : आर्थिक वर्ष समाप्तीकडे जात असल्याने सर्वसामान्य नागरिक आपला कर भरण्यासाठी नगरपालिका मुख्यालयांमध्ये धाव घेत असताना मालमत्ता विभागात मात्र शुकशुकाट दिसतआहे. कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात गुंतवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  कर भरण्यासाठी  ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शहराचे कचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या अंबरनाथ नगरपालिकेने गेल्या काही वर्षांत स्वच्छ सर्वेक्षणात मात्र आपला क्रमांक सुधारला आहे. सर्वाधिक झोपडपट्टीचा रहिवासी भाग असलेल्या अंबरनाथ शहरात अजुनही कचऱ्यावर प्रक्रियाही केली जात नाही. तरीही क्रमांक सुधारला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच २०२० स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेने जोरदार तयारी सुरु केली आहे. नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्यास पालिकेच्या गुणांमध्ये आणखी सुधारणा होत असून त्यामुळेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी पालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना या कामासाठी जुंपले आहे. यात मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत ७३ हजार नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करावे, असे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी विविध प्रभागातील इमारतींमध्ये जाऊन नागरिकांना आवाहन करण्याचे काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी आर्थिक वर्ष संपत आल्याने सर्वसामान्य नागरिक आपला कर भरण्यासाठी तसेच करासंबंधींच्या कामासाठी पालिका मुख्यालयात येत असून त्यांना कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे तिथे ताटकळट उभे रहावे लागत आहे. बुधवारीही अशाच प्रकारे मालमत्ता कर विभागात कर्मचाऱ्यांअभावी शुकशुकाट पसरला होता. तसेच कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना माघारी जावे लागत आहे. तसेच उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस असाच प्रकार सुरू राहणार असल्याचे समजते.