खोदकामांत ‘एमटीएनएल’च्या तारा तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट बंद

किशोर कोकणे, ठाणे</strong>

ठाण्यातील औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वागळे इस्टेट परिसरात ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू अससेल्या खोदकामांमुळे महानगर टेलिफोन निगम तसेच अन्य काही कंपन्यांच्या इंटरनेट आणि लॅण्डलाइन तारा तुटल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या भागांतील बहुतेक कंपन्यांचा संपर्कच तुटला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोबाइल फोनवरील वायफायद्वारेच काम भागवावे लागत आहे.

वागळे इस्टेट एमआयडीसीत सुमारे ३०० ते ४०० लघुउद्योग आहेत. त्यांपैकी बहुतेक कंपन्यांना महानगर टेलिफोन निगम कंपनीमार्फत (एमटीएनएल) लँडलाइन आणि इंटरनेट सेवा पुरविण्यात येते. या भागात गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसीकडून जलवाहिन्यांसाठी तर ठाणे महापालिकेकडूनही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम केले जात आहे. त्यात भूमिगत वाहिन्या तुटून एमटीएनएलची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून येथील अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मोबाइलवरील इंटरनेटद्वारे कार्यालयीन कामे करावी लागत आहेत. एमटीएनएलच्या इंटरनेट आणि लँडलाइनच्या तुटलेल्या तारा दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम आहे. हा त्रास कायम राहिला तर आम्हाला उद्योगधंदे अन्यत्र हलवावे लागतील, अशी टोकाची भूमिका काही उद्योजकांनी घेतली आहे.

सध्या जीएसटी, ई-वे बिल ऑनलाइन भरावे लागते. मात्र, इंटरनेट बंद झाल्याने मोबाइलवर किंवा डोंगलद्वारे इंटरनेट वापरावे लागते. मोबाइलवरील इंटरनेटचा वेग अत्यंत कमी असतो. त्यामुळे वेळही वाया जातो. सरकारला पायाभूत सुविधा आम्हाला पुरवता येत

नसतील तर आम्ही उद्योग कसे जगवावेत, असा सवाल उद्योजक करत आहेत. ग्राहकांना लँडलाइन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, तेच बंद राहिल्यामुळे ग्राहकांना आमच्याशी संपर्क साधणे अशक्य झाले आहे, अशी उद्योजकांची तक्रार आहे. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने (टीसा) या बाबत आपल्या ट्विटर खात्यावर अनेक तक्रारी केल्या. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे.

खोदकामांमुळे समस्या उद्भवत आहेत. मात्र, येथील तारा मार्चअखेपर्यंत दुरुस्त करण्यात येतील असे एमटीएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

गेल्या सहा महिन्यांपासून माझे एमटीएनलचे फोन बंद आहेत. आम्ही मोबाइल किंवा डोंगलचा वापर करतो. एमटीएनएलकडून दरमहा फोनचे देयक मात्र पाठविले जाते. वापर नसतानाही देयके कशी पाठविली जातात, याचेही उत्तर त्यांच्याकडे नसते.

– ए. अकोलावाला, सहसचिव, ‘टीसा’

एमटीएनलच्या ठाण्यातील अधिकाऱ्यांबोरबर या प्रश्नावर अनेकदा बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये केवळ काम पूर्ण करण्याची आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात एमटीएनएलकडून काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. आमच्याकडे काम करण्यासाठी पुरेसा कामगार वर्ग नाही अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळतात.

– एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ‘टीसा’