ऐरोली-ठाणेदरम्यान स्थानक उभारणी; ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने दर वाढवून नव्याने प्रक्रिया

ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली आणि ठाणे या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या दिघे रेल्वे स्थानकासाठी मध्य रेल्वेने आता पुन्हा निविदा मागवल्या आहेत. मुंबई शहर वाहतूक विकास प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यात हे स्थानक उभारण्यात येणार असून ते मध्य रेल्वेमार्गावरील कळवा स्थानकाशी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे स्थानकाच्या ट्रान्सहार्बर फलाटावरील गर्दी कमी होण्याची चिन्हे आहेत.

वाशी-ठाणे व पनवेल-ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कल्याणहून पनवेलकडे किंवा उलट दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग वेळेची बचत करणारा ठरत आहे. या मार्गावरील ऐरोली आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान दिघे हे नवीन स्थानक निर्माण करण्याचा प्रस्ताव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या दोन्ही स्थानकांमध्ये मोठे अंतर असून दिघा परिसरात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती दाटू लागली आहे. मात्र, या ठिकाणच्या प्रवाशांना ठाणे स्थानकच गाठावे लागते. दिघा, विटावा या भागातील नागरिक रेल्वे मार्गातून चालत ठाणे स्थानक गाठतात. मात्र, रेल्वेरुळांवरून जाण्याचा हा ‘शॉर्टकट’ प्रवाशांसाठी घातक असून या मार्गावर रेल्वेच्या धडकेने जखमी वा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने दिघे स्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग दिला आहे. दिघे स्थानक सुरू झाल्यास ठाण्याच्या ट्रान्सहार्बर फलाटावरील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे एमयूटीपीच्या तिसऱ्या टप्प्यातील कळवा-ऐरोली जोडमार्ग प्रकल्पातही या स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने यासाठी निविदा काढली होती. मात्र, या निविदेला कोणीही पंसती देत नसल्याचे समोर आले होते. आता दिघे रेल्वे स्थानकासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. त्यात दिघे रेल्वे स्थानक तयार करणे, कळवा येथील पादचारी पूल आणि फलाटाचे नूतनीकरण करणे, भुयारी मार्ग बनविणे, ओव्हरहेड वायर यासाठी ही निविदा मागविण्यात आली आहे. त्यासाठी अंदाजे खर्च १०७ कोटी आहे. पहिल्या निविदेमध्ये फेरफार करून नव्याने निविदा मागविण्यात आली आहे. हे काम १५ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच दिघा स्थानक तयार झाल्यानंतर कळवा आणि दिघा रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलाचेही काम करण्यात येईल. त्यासाठी जमीन हस्तांतरणाचे काम सुरू आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.