bठाणे जिल्हा न्यायालयातील तीन न्यायाधीशांकडून वकिलांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबाबत निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसंबंधीचा ठराव ठाणे जिल्हा वकील संघटनेने शनिवारी तातडीने घेतलेल्या बैठकीत मंजूर केला आहे.

या न्यायाधीशांवर आवश्यक त्या कारवाईसह त्यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी करणाऱ्या ठरावाची प्रत उच्च न्यायालयासह ठाणे जिल्हा न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना पाठवण्यात येणार असल्याचेही ठरावात म्हटले आहे. या तीन न्यायाधीशांमध्ये दोन सत्र न्यायाधीश, तर एक महानगरदंडाधिकाऱ्याचा समावेश आहे.

गेल्या वर्षभरापासून वकील वर्गात ठाणे जिल्हा न्यायालयातील काही न्यायाधीशांबद्दल कमालीची नाराजी आहे. या नाराजीचे प्रतिबिंब शनिवारी ठाणे वकील संघटनेच्या बैठकीत उमटले. या वेळी संबंधित न्यायाधिशांविरोधात वकिलांनी ठराव मांडून तो मंजूर केला. या न्यायाधीशांकडून न्यायालयीन शिष्टाचाराला बगल देत वकील आणि पक्षकारांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत असून त्याचा निषेध संघटनेकडून नोंदवण्यात आला आहे. तसेच ठराव मंजूर करण्यात आले आहे. तसेच या ठरावाची गंभीर दखल घेऊन या न्यायाधीशांवर ३१ ऑगस्टपूर्वी वा पर्यंत आवश्यक त्या कारवाईसह त्यांची अन्यत्र बदली करण्याची मागणीही ठरावात करण्यात आली आहे. ठरावाची प्रत उच्च न्यायालयाचे महानिबंधक आणि ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश यांना पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येण्याचेही ठरावात म्हटले आहे.