शहापूर, मुरबाडच्या शेतकऱ्यांना चांगला मोबदला; जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेचा फायदा

शहरी अवतार धारण करीत असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम ग्रामीण भागात आजही शेती हे रोजगाराचे प्रमुख साधन आहे. याचाच विचार करून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या योजनांचे शहापूर, मुरबाडमधील शेतकऱ्यांना चांगलेच फळ मिळू लागले आहे. या दोन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात पिकवण्यात येणारी भेंडी आणि कारली यांची युरोपांतील देशात निर्यात करण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे खास प्रशिक्षणही देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या योजनेनुसार भेंडी व कारल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा किलोमागे सात ते १२ रुपये अधिक मोबदला मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यत सध्या चार हजार आठशे हेक्टर जमिनीवर भेंडीचे उत्पादन होत आहे. मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील आवरे, तुटे, दहिवली, सापगाव, काळगाव, मुसई, कवडास,  शिरोळ,  कोलठाण, मानिवली, माणगाव आंबेरी, खुरावले,  बोरगाव, सायले, खांडपे, पावले धसई हिंदी आणि गवळी या गावात १९०० हेक्टरवर होणारी भेंडी लागवड  आखाती प्रदेश आणि युरोप देशात निर्यात केली जात आहे. परदेशात भेंडीबरोबरच  कारल्यालाही मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुरबाड व शहापूर तालुक्यात दोनशे एक हेक्टरवर कारल्याचे उत्पादन होत आहे. ठाणे जिल्ह्य़ातून परदेशात भेंडी आणि कारली वितरित करण्यासाठी पाच वितरक कार्यरत आहेत. त्यापैकी प्रत्येक वितरकाकडून आठवडय़ाला किमान ६ ते ४ टन आणि महिन्याला २० ते २५ टन भेंडी परदेशात वितरित केली जात आहे. निर्यात योग्य पद्धतीने होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि खासगी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.

निर्यातीसाठी गेलेल्या एखाद्या वाहनातील भेंडीचा दर्जा निकृष्ट निघाल्यास हा शेतमाल कुठून आला याची त्वरित तपासणी केली जाते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पन्नाचे नुकसान होऊ नये यासाठी भेंडीचा आकार कसा असावा, रंग कसा असावा, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे.

संकेतस्थळाची सुरुवात

शासनाने निर्यातीचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय शेतकरी परदेशात निर्यात करू शकत नाहीत. याकरिता भेंडी आणि कारल्याची निर्यात परदेशात करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. शासनाच्या (वेजनेट ) www.vegnet.in या संकेतस्थळावर इच्छुक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना निर्यातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ९०६ शेतकऱ्यांनी निर्यातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे. यामुळे वितरकांशिवाय शेतकऱ्यांना भाजीपाला थेट वितरित करता येत आहे.

गेल्या काही वर्षांत भेंडी आणि कारल्याचे ठाणे जिल्ह्यतील उत्पादन वाढले असल्याने परदेशात निर्यातही वाढली आहे. शेतकऱ्यांना रीतसर प्रशिक्षण देऊन ही भेंडी वितरकांच्या माध्यमातून निर्यात केली जात आहे. शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून शेतकरी थेट भाजीपाला वितरित करू शकतात.

एम. डी. सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे