लक्ष्मी निवास, घंटाळी रोड, ठाणे
विज्ञानाने अनेक शोध लावून मानवी जीवन झपाटय़ाने विकसित केले आहे. नवनवीन तंत्रज्ञान आल्याने कामाचा वेग वाढला आहे. उत्पन्नही वाढले आहे. इंटरनेटमुळे जगातले सर्व देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. दळणवळण, संदेशवाहन यंत्रणांनी वेळेची बचत झाली आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या निवासी संकुलांनी जागेचा प्रश्न सोडवला आहे. शिक्षणाने राहणीमान बदलून टाकले आहे. या बदलत्या जीवनशैलीतही कुठे ना कुठे जुन्या संस्कृतीच्या खुणा तग धरून आहेत. उंच टॉवरच्या या विश्वात ठाण्यातील लक्ष्मी निवास ही इमारतही जुन्या शेजारधर्म संस्कृतीची ठळक खूण म्हणून अजूनही रुबाबात उभी आहे..

ठाणे शहरात घंटाळी देवी परिसर या मध्यवर्ती ठिकाणी सहज जातायेता लक्ष्मी निवास इमारतीचे सहज दर्शन घडते. साधारणत: १९६२ च्या सुमारास घंटाळी परिसरात देवीचे मंदिर आणि तुरळक दुमजली चाळ पद्धतीची कौलारू घरे होती. मोकळ्या जागेवर शेती व्हायची. भोगावकर नावाच्या सद्गृहस्थांकडे त्या वेळी सुमारे १५ हजार चौरस फुटांची मोकळी जागा होती. उत्पन्नाचे साधन म्हणून त्यांनी या जागेवर तळमजला अधिक तीन मजले अशी चाळ बांधली आणि महिना केवळ ७५ रुपये भाडेकरारावर ती रहिवाशांना देऊ केली. त्या वेळी चाळीत संपूर्ण महाराष्ट्रीय लोकवस्ती होती. रहिवाशी मध्यमवर्गीय असल्याने मिळेल त्यात समाधान मानणारे होते. त्या वेळी वाहनव्यवस्था फारशी नव्हती. स्थानकापर्यंत टांग्याची सवारी होती. लक्ष्मी निवास तसे ठाणे स्थानकापासून जवळ असल्याने रहिवासी पायीच जात असत. मंदिर मार्ग हा रस्ता त्या वेळी एकच, तोही मातीचा आणि अरुंद होता. मंदिर मार्गावर यायचे झाल्यास मंदिरापाशी असलेले कंपाऊंड ओलांडून यावे लागत असे. मंदिर त्या वेळी लहान होते. कालांतराने ते मोठे झाले. मात्र धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरुवातीपासूनच होती. लक्ष्मी निवास हे सखल भागात आहे. मात्र तरीही पावसाळ्यात कधी पाणी साचण्याचा प्रसंगी कधी आला नाही, कारण पाण्याचा निचरा होण्याची येथील व्यवस्था अगदी उत्तम आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव रमेश मोरे यांनी दिली.
चाळ आणि फ्लॅटची रचना
साधारणपणे निवासी विभागातील इमारतीत एका मजल्यावर तीन ते चार सदनिका असतात. बंदिस्त खोल्या, स्वतंत्र शौचालय, न्हाणीघर, शेजारच्या घरात काय चालले आहे हेही कळणार नाही अशा ध्वनिरोधक भक्कम िभती, अशी एकंदरीत रचना पाहायला मिळते. चाळी म्हणजे पूर्वीची कौलारू आणि आता पत्राचे छप्पर असलेली बैठी घरे, तीही एकमेकांना खेटून असलेली. सार्वजनिक नळ, शौचालय, त्यावरील भांडणे, दरवाजे सताड उघडे असल्याने घराघरांत डोकावून पाहता येते. भरपूर असुविधा असूनही एकमेकांना मदत करीत जीवन सुसह्य़ करणारे शेजारी. श्रीकृष्ण निवासने ती संस्कृती जपून ठेवली आहे. संकुलाच्या एका मजल्याला १२ खोल्या आहेत. अशा चार मजल्यांवर एकूण ४८ खोल्या पाहायला मिळतात. इंग्रजी यू आकाराची ही इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर एकच गॅलरी आहे, ती पहिल्या खोलीपासून सुरू झाली की ती १२ व्या खोलीपर्यंत संपते. शौचालय, न्हाणीघर आणि पाण्याची मात्र स्वतंत्र व्यवस्था आहे. मध्यमवर्गीय मराठमोळी माणसे आणि काहीशी चाळ संस्कृतीत वाढलेली असल्याने खोल्यांचे दरवाजे मात्र दिवसभर उघडे असतात. गॅलरीत ये-जा करताना कोणाच्या घरात काय चालले आहे हे डोकावून बघता येते आणि कोणी हाक मारली तर लगेच खोलीत जाताही येते. त्यामुळे सुख-दु:खाचा प्रसंगही लागलीच कळतो व त्यात सहभागी होता येते. मजले चढण्यासाठी जो जिना आहे तो जरा उंच आणि लांबलचक आहे. तरुण मंडळी तो सहज पार करतात, प्रश्न राहतो तो ज्येष्ठांचा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरील कोणी वयोवृद्ध मंडळी राहत असतील तर शक्यतो खाली उतरण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
आणि पाण्याची समस्या मिटली
पूर्वी इमारतीच्या गच्चीवर पाण्याची टाकी होती. त्यामुळे गळतीच्या समस्यांनी तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी हैराण होत असत. पाण्याची समस्याही निर्माण झाली होती. त्यामुळे ती टाकीच काढून टाकण्यात आली. पाण्याची टाकी खाली बसविण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पाणी मिळू लागले, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील पाण्याची समस्या काही मिटेना. शेवटी प्रत्येकाने एक हजार रुपये काढून पंप बसविण्यात आला. त्यामुळे पाण्याची समस्या मिटली.
भाडेकरू झाले मालक
लक्ष्मी निवास संकुलातील प्रत्येक रहिवाशाकडून ७५ रुपये दरमहा मालक भाडे आकारत असे, परंतु मालकाला कालांतराने ते परवडेनासे झाले. मालकाने खोल्या विकत घेण्याची संधी भाडेकरूंना दिली. १०० रुपयांप्रमाणे १५ महिन्यांचे भाडे एकरकमी देण्यास सांगून खोल्यांचा मालकी हक्क घेण्याचे सांगितले. रहिवाशांनी ती संधी साधली. मालक झाल्यानंतर डीम्ड कन्व्हेअन्ससाठी (मानीव अभिहस्तांतरण) सोसायटीने अर्ज केला. त्याला कोणतीही आडकाठी न करता मालकाने सहकार्य केले. आज डीम्ड कन्व्हेअन्सचेही काम झाल्याने इमारतीचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाहनतळाची समस्या
१५ हजार चौरस फूट जागेवर तळ अधिक तीन मजल्यांची इमारत उभी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनतळासाठी जागा आज अपुरी पडत आहे. दुचाकी वाहनांना इमारतींसमोर जागा आहे; परंतु चारचाकी वाहनांना भर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. सुरक्षा व्यवस्थेची तशी फारशी गरज नाही, कारण संकुलात तसे खुले वातावरण असल्याने व रस्त्यावर वर्दळ असल्याने तसा काही अनुचित प्रकार घडणे शक्य नाही. सफाई कामगार, पाणी सोडणारा आणि दुरुस्तीवरील खर्च एवढाच काय तो सोसायटीवर आर्थिक भार आहे.
पुनर्विकास रखडला
नव्या नियमांनुसार लक्ष्मी निवासचा पुनर्विकास करणे कठीण होऊन बसले आहे, कारण निवासी संकुलासाठी जितकी जागा आवश्यक आहे, ती लक्ष्मी निवासाजवळ नाही. कारण सोसायटीची बरीचशी जागा रस्तारुंदीकरणात गेली आहे. पुरेशी जागा नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकही येथे फिरकत नाही. जर जादा चटई क्षेत्र (एफएसआय) मिळाले तर निश्चितच इमारतीचा पुनर्विकास होऊ शकतो आणि चाळ संस्कृतीत अनेक समस्यांचा सामना करत वाढलेल्या रहिवाशांचे मोठय़ा आणि आलिशान घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दुरुस्तीमुळे आता पन्नाशी ओलांडलेल्या इमारतीचे वय जरी आणखी सात वर्षांनी वाढले असले तरी धोका टळलेला नाही. सरकारी यंत्रणांनी लवकरच याबाबत गांभीर्याची भूमिका घेऊन जादा चटई क्षेत्राची त्वरित कार्यवाही करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. जादा चटई क्षेत्र मिळण्याची प्रतीक्षा येथील सर्वच रहिवाशांना लागून राहिली आहे.

School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून

धोकादायक इमारतीची नोटीस
बी केबिनमधील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने जुन्या इमारतींना धोकादायक घोषित करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले. लक्ष्मी निवास इमारतीलाही यामध्ये धोकादायक ठरविण्यात आले होते. लक्ष्मी निवासलाही ५५ वर्षे झाली असल्याने त्याचीही तशी पडझड सुरू होती. पाण्याची गळती, पिल्लर कमकुवत, भिंतीचे पापुद्रे निघणे, खपली, भेगा पडणे असे प्रकार सुरू होते. इमारतीची डागडुजी करणे अत्यंत आवश्यक होते; परंतु त्यासाठी पैसा हा हवाच. तो कसा जमा करायचा, ही चिंता सतावू लागली. अखेर सोसायटीने पैशाची जमवाजमव सुरू केली आणि बघता बघता १२ लाख रुपये जमा झाले. आज इमारतींची दुरुस्ती आणि इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील किमान सात ते आठ वर्षे इमारतीला धोका नाही.
सुहास धुरी suhas.dhuri@expressindia.com