23 November 2017

News Flash

‘ऑनलाइन’ खेळाविरोधात पोलीस मैदानात

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळाने अनेक पालकांची झोप उडविली

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: September 13, 2017 3:17 AM

‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळाने अनेक पालकांची झोप उडविली आहे.

पालक आणि शिक्षकांसाठी ठाण्यात विशेष जागृती मोहीम

एकलकोंडेपणा, चिडचिड, अभ्यासाकडे दुर्लक्ष, परीक्षेतील गुणांची घसरण आणि त्यांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवा, अशा महत्त्वाच्या सूचना ठाणे पोलिसांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाइन जीवघेण्या खेळाच्या पाश्र्वभूमीवर पालकांना दिल्या आहेत. मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या ऑनलाइन खेळाच्या जाळ्यात मुलांनी अडकू नये म्हणून पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी ठाणे पोलिसांनी आता जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी पालक आणि शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळाने अनेक पालकांची झोप उडविली आहे. या खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या काही मुलांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये भारतातील विविध शहरातील मुलांचाही समावेश आहे. या खेळातील टप्प्यांमधील आव्हान स्वीकारण्याच्या नादात हे प्रकार घडत आहेत. ठाणे शहरामध्ये अशा प्रकारची घटना अद्याप घडलेली नाही. मात्र, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून ठाणे पोलीसही आता पुढे सरसावले आहेत. या खेळाविरोधात जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी पोलिसांनी पालक आणि शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘ब्ल्यू व्हेल’ काय आहे?

ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन खेळामध्ये सहभागी होणाऱ्यास विहीत कालावधीत काही टप्पे पूर्ण करावे लागतात आणि त्यासंबंधीचे फोटो संबंधितांना अपलोड करावे लागतात. हा खेळ विनामूल्य डाऊनलोड करता येत नाही आणि कोणत्याही ऑनलाइन अ‍ॅप्स स्टोअरमध्येही उपलब्ध नाही. समाजमाध्यमांवरील ग्रुपच्या साहाय्याने हा खेळ शेअर केला जातो. या खेळाचा निर्माता हा मुलांना हेरून त्यांना या खेळासाठी आमंत्रित करतो. या खेळामधील विविध टप्प्यांवरील आव्हाने स्वीकारताना मुले खेळाचा एक भाग म्हणून स्वत:ला इजा करून घेतात आणि काही वेळेस आत्महत्याही करतात.

पोलिसांच्या सूचना

* मुलांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवणे, मुलांचा एकलकोंडेपणा, होणारी चिडचिड, अभ्यासाकडे दुर्लक्ष, परीक्षेतील गुणांची घसरण याकडे पालक व शिक्षकांनी दुर्लक्ष करू नये.

* त्यांचा इंटरनेट वापर नियंत्रित ठेवणे. मुले कोणत्या वेबसाईटला भेट देतात, याची माहिती घ्या.

* मुलांसोबत संवाद साधून त्यांना या खेळाच्या संभाव्य धोक्याविषयी माहिती द्या.

* शाळांमध्ये ई-गॅझेटच्या वापरावर निर्बंध घालणे, मुलांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे.

First Published on September 13, 2017 3:17 am

Web Title: thane cops to keep eyes on online game