News Flash

याचसाठी केला होता का टॅब अट्टहास?

टॅबचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी क्वचितच केला जात असल्याचे उघड होत आहे.

ठाण्यातील नगरसेवकांना वाटलेल्या टॅबचा कामकाजासाठी वापर नाहीच

ठाणे महापालिकेचा कारभार कागदमुक्त करण्याचे दावे करीत पालिकेतील १३० नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ३८ लाख रुपये खर्चून टॅब वाटण्यात आले. मात्र या टॅबचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी क्वचितच केला जात असल्याचे उघड होत आहे. तब्बल वर्षभरापूर्वी टॅबखरेदी केल्यानंतरही पालिकेच्या सचिव विभागाने आतापर्यंत अवघ्या दोन सभांची सविस्तर विषयपत्रिका या टॅबवर उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, कागदमुक्तीच्या संकल्पानंतरही सभांच्या विषयपत्रिका, इतिवृत्त, प्रशासकीय कामकाजाच्या माहितीची टिपण या गोष्टी छापील स्वरूपात नगरसेवकांना पाठवल्या जात असल्याने ‘टॅब’चा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न खुद्द महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाही पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कागदमुक्त कारभाराचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी नगरसेवकांना वाटप करण्यात आलेल्या टॅबचा प्रशासकीय कामकाजासाठी फारसा वापर होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे ३८ लाख रुपये खर्च करून या टॅबचा वापर होत नसल्याबद्दल जयस्वाल यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखांची खरडपट्टी काढल्याचे समजते. सचिव तसेच महापालिकेच्या विविध समित्यांच्या कामकाजालाही अद्याप कागदमुक्ती मिळाली नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जेमतेम दोन सर्वसाधारण सभांच्या कार्यक्रमपत्रिका, विषयांचे गोषवारे नगरसेवकांना ऑनलाइन धाडण्यात आले आहेत.  मात्र गोषवारे मिळाले नाहीत म्हणून नगरसेवकांकडून विचारणा झाल्याने पुन्हा कागदी विषयपत्रिकांचे गठ्ठे त्यांना रवाना करण्यात आले, अशी माहिती सचिव विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.

डिजिटल साक्षरतेचे वावडे?

देशभरात डिजिटल साक्षरतेचे वारे वाहू लागल्याने दोन वर्षांपूर्वी नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाकडून ऑनलाइन विषयपत्रिका मिळावी असा आग्रह धरण्यात आला. ठाणे महापालिकेच्या वेबसाइटवर प्रमुख सभांच्या विषयपत्रिका टाकण्यात येतात. मात्र, या विषयांचा सविस्तर गोषवारा नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाइन उपलब्ध नसतो. नगरसेवकांनाही गोषवारा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावा ही मागणी जोर धरू लागल्याने तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी १३० नगरसेवकांसाठी टॅबखरेदीचा निर्णय घेतला. ठाणे महापालिकेतील काही नगरसेवकांच्या डिजिटल साक्षरतेविषयी प्रश्न उपस्थित करण्याजोगी परिस्थिती असताना यासंबंधी कोणताही र्सवकक्ष विचार न करता सरसकट १४० टॅब खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रति टॅब २७ हजार याप्रमाणे ३७ लाख ८० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. एवढय़ा मोठय़ा रकमेची खरेदी केल्यानंतरही नगरसेवकांना विषयपत्रिका आणि गोषवारे ऑनलाइन उपलब्ध होतच नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘तांत्रिक अडचण नाही’

महापालिकेच्या प्रत्येक सभांची विषयपत्रिका तसेच गोषवारे ऑनलाइन पाठविण्याची सर्व यंत्रणा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केली असून या प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण नाही. मात्र कार्यक्रमपत्रिका ऑनलाइन पाठविण्याची मानसिकता सर्व विभागांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी काही गोषवारे ऑनलाइन पाठविण्यात आले आहेत. मात्र हे नियमित होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख स्वरूप कुलकर्णी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 2:21 am

Web Title: thane corporators tab issue
Next Stories
1 महिला पोलिसांसाठी ‘चेंजिंग रूम’ची सुविधा
2 स्कायवॉकवर पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान
3 गर्दुल्ल्यांमुळे कल्याणमधील स्कायवॉकला आग
Just Now!
X