कल्याण : महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचा आव्हान अर्ज फेटाळून लावत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी राजेश गुप्ता यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डॉक्टरला न्यायदंडाधिकाऱ्यांनी  दोषी ठरवत एक वर्षांची सक्तमजुरीची ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली. त्याच बरोबर तीन हजार रुपये दंड आणि ती रक्कम न्यायालयात भरणा केली नाही तर आणखी तीन महिने शिक्षा भोगण्याचा आदेश दिला.

नौपाडा पोलीस ठाण्यात सहा वर्षांपूर्वी महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा गुन्हा डॉ. जयंत जाधव (४४) याच्यावर दाखल झाला होता. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाला सांगितले, ५४ वर्षांची एक महिला रुग्ण डॉ. जाधव यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. रुग्ण म्हणून तपासणी करताना डॉ. जाधव यांनी एकाच दिवशी दोन वेळा या महिला रुग्णाचा विनयभंग केला होता. या महिलेने याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी त्याला अटक केली होती. ठाणे जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी डॉ. जाधव यांना दोषी ठरविले होते. या प्रकरणात जाधव यांनी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. जिल्हा न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावत जाधव यांची शिक्षा कायम ठेवली