ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील एका अंमली पदार्थाच्या तस्कराकडून पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर हे डिझायनर ड्रग्स पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.

हितेश मल्होत्रा (33) नावाच्या एका ड्रग तस्कराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 एलएसडी पेपर, चार किलो चरस असा जवळपास 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मल्होत्रा याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॅडबरी जंक्शन येथे सापळा रचून 8 जून रोजी रात्री अटक केल्याची माहिती आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतल्या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.

काय आहे पेपर बॉम्ब –
पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर. पिंक सुपर मॅन, ब्ल्यू – बॅटमॅन, ब्लॅक – स्पाईडरमॅन, आय – 25 अशा विविध कोडवर्डने ड्रग्स मार्केटमध्ये एलएसडी पेपर ओळखला जातो. हे ड्रग्स पावडर, टॅबलेट आणि लिक्विड अशा तिन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. तरुणाईकडून या ड्रग्सच्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते. या पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळू लागतो आणि नशा चढते. पेपर बॉम्ब या ड्रग्जने ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोपात घातला आहे. विदेशात या ड्रग्सवर कडक निर्बंध आहेत.