नगरसेवकपद रद्द होण्याच्या भीतीने शून्य मालमत्तेचे मानकरी

बेकायदा बांधकामाची राजधानी ठरलेल्या दिव्यात यावेळी वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी येथील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले असले तरी उमेदवाराच्या नावे स्थावर मालमत्ता नसेल याची पुरेपूर ‘काळजी’ सर्वच पक्षांनी घेतली आहे. मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार बेकायदा बांधकामात सहभागवा थेट मालकी आढळून आल्यास नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुतांश नगरसेवकांची पदे यामुळे धोक्यात आल्याचे चित्र यापूर्वी पाहायला मिळाले आहे. दिव्यातील ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक मालमत्ता या बेकायदा आहेत.

[jwplayer 5wCSijMb]

पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने दिवा आणि आसपासच्या शहरांचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने या संपूर्ण पट्टय़ाकडे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे दिव्यात गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने बेकायदा इमारती, चाळी उभ्या राहिल्या आहेत. येथील राजकीय वरदहस्ताशिवाय या बांधकामांची उभारणी शक्य नसली तरी येथून निवडणूक लढवीत असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावे एकही मालमत्ता नसल्याचे पाहून दिवावासीय अचंबित झाले आहेत. दिव्यातील काही प्रभागांमध्ये राजकीय वर्चस्वाचे गणित येथील बेकायदा बांधकामे आणि चाळींमधून ठरते असा इतिहास आहे.

या भागातून काही वर्षांपूर्वी निवडून आलेला आणि पुन्हा निवडणूक रिंगणात असलेल्या एका उमेदवाराची येथील बेकायदा चाळींमधून काही ‘हक्का’ची मते असल्याचे सांगितले जाते. इमारती, चाळी उभारून तेथे मालकी हक्काने अथवा भाडय़ाने घरे देऊन पैसे तर कमवायचे शिवाय हक्काची मतपेढी तयार करायची असे येथील वर्षांनुवर्षांचे राजकारण आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने नवी बांधकामे उभी राहात असतात. ठाणे महापालिकेत संजीव जयस्वाल यांच्यासारखा खमका आयुक्त असूनही त्यांनाही येथील बेकायदा बांधकामे रोखणे जमलेले नाही. असे असताना सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या नावे साधे २०० फुटाचे घरही नसल्याचे पाहून दिवेकर मतदार आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

बेकायदा बांधकामात सहभाग?

निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आपली मालमत्ता, आर्थिक उत्पन्न आणि संपत्ती यांचे विवरण देणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगास सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रांच्या तपशिलावरून ही माहिती उघड झाली आहे. २००७ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर मोठय़ा मताधिक्याने निवडून आलेले माजी नगरसेवक आणि विद्यमान उमेदवार रमाकांत मढवी यांची स्थावर मालमत्ता शून्य आहे. तसेच मनसेतून शिवसेनेत आलेल्या सुनीता मुंडे यांनीही आपली स्थावर मालमत्ता शून्य दाखविली आहे. भाजपचे उमेदवार रोहिदास मुंडे, सुवर्णा म्हात्रे, दिनेश जाधव, सीमा भगत, अर्चना पाटील, मनसेचे सोपान जाधव, मयूरी पोरजी, संगीता भोईर, शिवसेनेचे अमर पाटील, अंकिता पाटील, राष्ट्रवादीचे अनुराग पाटील तसेच भाजपने तिकीट दिले नाही म्हणून अपक्ष उभे राहिलेले विकास इंगळे आदी सर्व उमेदवारांची स्थावर मालमत्ता ही शून्य आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नावे शहापूर, अलिबाग येथे जमीन आहे, तर दिव्यात घर असल्याचा उल्लेख आहे. पाटील यांच्याविरोधात बेकायदा बांधकामात सहभाग असल्याची तक्रार दाखल केल्याने नगरसेवकपद धोक्यात आले होते.

दिवा परिसरात एक कुटुंब पद्धतीने अनेक जणांचे वास्तव्य आहे. त्यामुळे काही उमेदवारांच्या नावे स्वतचे घर नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही बहुतांश उमेदवारांच्या नावे स्वतची मालमत्ता नव्हती.

 अ‍ॅड. आदेश भगत, भाजप उमेदवार 

[jwplayer k4dUpC7B]