22 September 2020

News Flash

दिव्यात शिवसेनेला आव्हान 

२०१२ साली झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून शैलेश पाटील हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.

 

राजकारणाचे वारे फिरले

दिव्यात यंदाची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. शिवसेना-भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत येथील बहुतांश प्रभागांमध्ये पाहायला मिळत आहे. यंदा भागातील नगरसेवकांची संख्या दोनवरून थेट अकरापर्यंत पोहचली आहे. या सर्व जागांवर शिवसेना हा प्रमुख पक्ष असून वेगवेगळ्या प्रभागांमध्ये या पक्षाची लढत भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीसोबत होताना दिसत आहे. भाजपला यंदा दिव्यातून किमान आठ जागांवर यश मिळेल अशी आशा वाटत आहे.

२०१२ साली झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून शैलेश पाटील हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नेते राजू पाटील यांचे शैलेश हे एकेकाळचे कट्टर समर्थक. मात्र, राज्याच्या राजकारणाचे वारे फिरले तसे शैलेश यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेने या प्रभागातून त्यांच्यासह दीपाली भगत, अमर पाटील आणि अंकिता पाटील यांना येथून रिंगणात उतरविले आहे.

भाजपने शैलेश पाटील यांच्याविरोधात अ‍ॅड. आदेश भगत यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासोबत सचिन भोईर, अर्चना पाटील, सीमा भगत यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शैलेश पाटील आणि आदेश भगत ही महापालिका निवडणुकीतील सर्वात रंगतदार लढत ठरण्याची चिन्हे असून या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मनसेने या प्रभागातून तुषार पाटील यांना उमेदवारी देत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासोबत मयूरी पोरजी, तुषार पाटील, प्रदीप पाटील हे उभे आहेत.

प्रभाग क्रमांक २७

दिवा, साबे, सद्गुरूनगर, बी.आर.नगर

पुरुष – १४७६५

महिला – ११७९८

एकूण मतदार – २६५६३

राष्ट्रवादी, सेनेसाठी प्रतिष्ठेचा सामना

या प्रभागातून राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे. या प्रभागात १० हजाराहून अधिक मुस्लीम मते असल्याने येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हिरा पाटील यांनी शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यातील ताईत मानले जाणारे हिरा पाटील यांचा प्रभाव येथे असून या प्रभागात शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. पाच वर्षांपूर्वी सुभाष भोईर यांचा हिरा पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आमदार भोईर यांनी मुलगा सुमीत याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने अ‍ॅड. किरण भोईर, मनसेने दिनेश पाटील यांना उतरविले आहे. बाबाजी पाटील यांचा अनुभव तगडा असून भाजप व सेनेचे उमेदवार हे नवखे आहेत. या भागात भूमिपुत्र व मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.

प्रभाग क्रमांक २९

खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, कौसा तलाव

पुरुष – ९,३६३

महिला – ११,०४७

एकूण मतदार – २०,४१०

 

कोकणवासीय, बंगाली मतदार

ठाणे महापालिका हद्दीतून येणारा कचरा याच प्रभागात टाकला जात असल्याने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा प्रभाग चांगलाच गाजला. येथेही सेना, भाजप आणि मनसेत जोरदार लढत रंगणार आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका सुनीता मुंडे यांना सेनेने येथून उमेदवारी दिली आहे. भाजपने त्यांच्या विरोधात रेश्मा पवार यांना तर मनसेने नयना गायकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे रमाकांत मढवी यांचे प्रस्थ येथे असून त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने रोहिदास मुंडे यांना रिंगणात उतरविले आहे, तर मनसेने मोतीराम दळवी यांना तिकीट दिले आहे. याबरोबरच भाजपच्या कल्पना पाटील, जयसिंग कांबळे व सेनेचे दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, मनसेच्या नम्रता बेडेकर व सोपान जाधव यांच्यातही जोरदार लढत होईल. निवडणुकीच्या तोंडावर येथील कचऱ्याचा प्रश्न गाजत असून निवडणुकीनंतर ही कचराभूमी बंद करण्याचे आश्वासन सर्वच पक्ष मतदारांना देत आहेत. या प्रभागात कोकणवासीयांसोबतच उत्तर भारतीय व बंगाली मतदारांचे वास्तव्य आहे.

प्रभाग क्रमांक २८

आगासन, म्हातार्डी, बेतवडे, दातिवली, भोलेनाथनगर, बेडेकरनगर

पुरुष – १३,७२०

महिला – १०,६२६

एकूण मतदार – २४,३४६

राज ठाकरे आज दिव्यात

डोंबिवली : ठाणे महापालिकेच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदा मूळ शहरात प्रचाराचा धडाका उडवून देण्याऐवजी दिव्यात सभा घेण्याचे ठरविले आहे. गेल्या निवडणुकीत दिव्यामध्ये दोन जागांवर मनसेचे नगरसेवक निवडून आल्याने दिवा शहर मनसेने एकहाती जिंकले होते. तेव्हापासून दिवा हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाही मनसेने या ठिकाणी जोर लावला आहे. दरम्यान, दिव्यातील एकमेव सभेचा अपवाद वगळला तर राज यांची ठाण्यात इतरत्र सभा घेण्यात येणार नाही, असे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

ठाणे महापालिकेचा एक भाग असलेले दिवा शहर हे पायाभूत सुविधांपासून कायम वंचित राहिले आहे. सत्ताधारी शिवसेनेला पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत येथील मतदारांच्या नाराजीचा फटका बसला होता. दिव्यातील मतदारांनी मनसेच्या शैलेश पाटील यांना मतदान करीत शिवसेनेला पराभूत केले होते. मनसेचे राजू पाटील, रमेश पाटील यांचे या भागावर वर्चस्व राहिले असून मनसेचा हा बालेकिल्ला यंदाही शाबूत रहावा यासाठी राज बुधवारी या ठिकाणी सभा घेत आहेत. मनसेने काही महिन्यांपूर्वी येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिवा उत्सवचे आयोजन केले होते. त्यानंतर अभिजित पानसे यांनी दिवा कचराभूमीवर आंदोलन करीत मनसेला चर्चेत ठेवले.

नाशिक सहलीला उत्तर भारतीय  

नाशिकच्या धर्तीवर दिव्याचाही कायापालट करण्याचे स्वप्न दाखवीत मनसेने येथील नागरिकांसाठी नाशिक येथे एक दिवसीय सहलीचेही आयोजन केले. या सहलीला उत्तर भारतीय नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दिवा उत्सवला राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवून दिव्यामध्ये जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, गेल्या निवडणुकीत मूळ शहरात तळ ठोकून बसणारे राज यंदा ठाण्यात मात्र सभा घेणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2017 4:48 am

Web Title: thane elections 2017 thane municipal corporation election 2017 shiv sena issue in diva
Next Stories
1 सिंथेटिक ट्रॅक कधी मिळणार ?
2 पादचाऱ्यांची काळजी प्राधान्याने घ्यावी
3 घोडबंदर किल्ला सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा
Just Now!
X