रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जागोजागी वाहतूक कोंडी

ठाणे : मुंब्रा बावळण रस्त्यावर वाहतुकीस बंदी करण्यात आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जाणाऱ्या वाहनांना आता रस्त्यांवरील खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे ठाणे शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांची पार दुर्दशा झाली असल्याने या ठिकाणी वाहने संथगतीने हाकावी लागत आहेत. महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली असून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिळफाटा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहराच्या अंतर्गत भागातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे. ठाण्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण ठाणे स्थानक परिसरातून जाणाऱ्या वाहतुकीवर पडत आहे. त्यातच गुरुवारी कोपरी पुलावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. निमुळता पूल आणि गर्दीच्या वेळी सुरू असलेले काम यामुळे या पुलावरील वाहनांच्या राग्ांा कॅडबरी पुलापर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे नेहमीच्या प्रवासापेक्षा गुरुवारी १५-२० मिनिटे अधिक वेळ प्रवासात खर्च होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

शहरातील जागोजागी सुरू असलेली रस्त्यांची कामे, रस्त्यांमध्ये पडलेले भले मोठे खड्डे यामुळे अंतर्गत वाहतुकीवर ताण आल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. वर्तकनगर, वागळे इस्टेट या भागात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची आणि रस्ता दुभाजकांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे या परिसरात कोंडी होत आहे. नितीन कंपनीकडून वागळे इस्टेट परिसराकडे जाताना एकेरी वाहतूक सुरू असल्याने सायंकाळच्या वेळी पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी लागतो.

कार्यालयात पोहचण्यासाठी वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन वेळेपूर्वीच घरातून बाहेर पडत असलो, तरी दररोज वीस ते पंचवीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे उशीर होत असतो. दिवसेंदिवस सकाळच्या वेळेत

या चौकात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अवलंबणे नको वाटते, असे मल्हार चित्रपटगृहाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नियमित प्रवास करणारे प्रकाश गीर यांनी सांगितले.

१५ मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तास

कल्याण, डोंबिवली शहरांतील रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली असून काटई नाका ते शिळफाटा मार्गावरील प्रवास नकोसा वाटू लागला आहे. सकाळच्या वेळेत पलावा वसाहतीमधून मोठय़ा प्रमाणात वाहने शिळफाटय़ाने जाण्यासाठी बाहेर पडतात. या वाहनांची संख्या अधिक असल्याने शिळफाटय़ाकडून कल्याण, बदलापूरकडे येणारी व डोंबिवलीकडून, बदलापूरकडून शिळफाटय़ाकडे जाणारी वाहने पलावा चौकातील कोंडीमुळे अडकून पडतात. एरवी १५ मिनिटांचे हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहे. कल्याण पूर्व, कोन गाव, भिवंडी बाह्यवळण मार्ग, डोंबिवलीतील मानपाडा रस्ता या ठिकाणीही प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे.  कल्याणमधील मुंबईकडे जाणारा रहिवासी लालचौकी, दुर्गाडी चौकात दोन ते तीन तास अडकून पडत आहे. आधारवाडी ते पडघा मार्गाची अवजड वाहनांमुळे वाताहत झाली आहे. जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने दोन दिवसांपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नवीन पुलावरही कोंडीची शक्यता आहे.

कोपरी पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू असते. गुरुवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी कामगारांना बोलावून रस्त्याचे काम करवून खड्डे बुजवून घेतले. या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे शहरात स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या अंतर्गत वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली.

-हेमलता शेरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी वाहतूक शाखा

शहरातील अंतर्गत भागात अनेक खड्डे आहेत. या खड्डय़ांमुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. गुरुवारी पूर्व द्रूतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील गोखले रोड, सेवा रस्ते या अंतर्गत मार्गावर वाहतुकीचा अधिक ताण आला. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांतर्फे ही कोंडी सोडवण्यात आली आहे. 

– अनिल वाघमारे, पोलीस निरीक्षक, ठाणे वाहतूक शाखा प्रशासन विभागप्रमुख.