लोकप्रतिनिधींविरोधात प्रशासकीय वर्तुळात मोठय़ा हालचाली

ठाणे : ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल आणि लोकप्रतिनिधीमध्ये सुरू झालेला संघर्ष चिघळू लागला असून महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने आलेल्या प्रस्तावांना कात्री लावण्याचे आदेश गुरुवारी प्रशासकीय वर्तुळात देण्यात आल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता आणखी वाढली आहे. नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षांनंतर सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवरील ४८ विषय प्रशासनाने बुधवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला तेव्हाच हा वाद आणखी चिघळणार असे संकेत मिळू लागले होते. गुरुवारी अतिक्रमण विभागाला वेगवेगळ्या प्रभागात झालेल्या बेकायदा बांधकामांच्या मुळाशी कोण आहे याची माहिती घेण्याच्या सूचनाही दिल्या गेल्याचे वृत्त असून शहर विकास विभागासही विकास प्रस्तावांची नव्याने चाचपणी करण्यास सांगण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फतच या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात असून यामुळे कळवा रुग्णालयात हृदयरोगांवर विनामूल्य उपचार करण्यासाठी महापौरांनी आखलेली योजनाही अडचणीत येऊ शकते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर होती. लोकप्रतिनिधींनी बुधवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत जयस्वाल यांच्याविरोधात आगपाखड करत थेट अविश्वास ठराव आणण्याची भाषा सुरू केल्याने गुरुवारी दिवसभर प्रशासकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू होत्या. विशेष म्हणजे, आयुक्त जयस्वाल स्वत दिल्ली दौऱ्यावर असून ते दिवसभर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सूचना देत होते, अशी माहिती आहे. सायंकाळी उशिरा आयुक्तांनी काही विभागप्रमुखांची बैठकही घेतली. या बैठकीत सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांची, काढण्यात आलेल्या निविदांची तसेच शहर विकास विभागामार्फत मंजुऱ्यांच्या प्रस्तावांची नव्याने चाचपणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त आहे.

सर्वसाधारण सभेत मुंबईतल्या दोन शैक्षणिक संस्था आणि ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलला विनामुल्य भूखंड देण्यावरून वागंद झाला होता. यापैकी ज्युपीटर रुग्णालयाला देण्यात येणारा भुखंडाचा प्रस्ताव राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांच्या आक्रमक विरोधानंतर तहकूब ठेवला गेला. तसेच शिक्षण विभागाचे काही प्रस्तावही स्थगित ठेवण्यात आले. त्यामुळे प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये संघर्षांची ठिणगी पडली आहे. बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्व अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला. महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे महापौरांच्या पुढाकाराने मांडण्यात आलेल्या प्रस्तावांचा फेरविचार करण्याच्या सूचना आयुक्तांनी गुरुवारी दिल्याचे वृत्त आहे. तसेच ठाण्यातील लोकप्रतिनिधींशी सलग्न असलेल्या संस्थांना अल्प दरात जे भूखंड देण्यात आले आहेत त्यांच्या विरोधात कारवाई तसेच एखाद्या संस्थेने पैसे भरले नसतील तर त्याची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, याविषयी महापालिका वर्तुळात एकही अधिकारी जाहीरपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नव्हता. स्वत: जयस्वाल यांनीही या वादाविषयी मतप्रदर्शन करणे दिवसभर टाळले.

विषयपत्रिकेवरील मागे घेण्यात आलेल्या विषयांचा निर्णय सभागृहातच घेतला जाईल. तो अधिकार आयुक्तांना नाही. कळवा रुग्णालयातील योजना मागे घेऊन प्रशासन लोकप्रतिनिधींवर दबाव वाढवू पहात असेल तर अनाकलनीय आहे.

– मीनाक्षी शिंदे, महापौर ठाणे</strong>