09 March 2021

News Flash

कंत्राटदार बनू नका!

‘सध्याच्या परिस्थितीत ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येते ही ऐतिहासिक घटना आहे.

शिवसेना नेत्यांची पक्षाच्या नगरसेवकांना तंबी

समाजकार्य करता करता नगरसेवक बनून पालिकेची पायरी चढायची आणि मग पालिकेतील कंत्राटे आपल्या खिशात घालून गब्बर व्हायचे, अशा सर्वच महापालिकेतील नगरसेवकांबाबत येणाऱ्या अनुभवातून जनतेमध्ये निर्माण होणारा असंतोष लक्षात घेऊन शिवसेनेने यंदा पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना सज्जड दम भरला आहे. ‘ठाण्यात शिवसैनिकांची मेहनत आणि ठाणेकरांची साथ यामुळे सत्ता आली आहे. ही सत्ता ठाणेकरांची आहे, याचे भान बाळगा. यापुढे एकही नगरसेवक कंत्राटदाराच्या भूमिकेत दिसला तर, त्याची गय नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना तंबी दिली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांची एक बैठक सोमवारी टीपटॉप प्लॉझा सभागृहात बोलविण्यात आली होती. सभागृहातील पक्षाच्या नगरसेवकांचे वर्तन कसे असावे, येथील कामकाजाची पद्धत कशी असते तसेच संघटना, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय कशा प्रकारे ठेवला जावा यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार या बैठकीस उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने नगरसेवक झाल्याच्या आनंदात येथे आलेल्या चेहऱ्यांवर धास्तीचे ढग अवतरल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले.

‘सध्याच्या परिस्थितीत ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येते ही ऐतिहासिक घटना आहे. विरोधकांनी जोर लावूनही ठाणेकरांनी शिवसेनेला प्रथमच बहुमताचा आकडा गाठून दिला. त्यामुळे येथील मतदारांचे आणि शिवसैनिकांचे उपकार विसरू नका,’ अशा शब्दात शिंदे यांनी या वेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. ‘प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिकांनी घेतलेल्या अपार मेहनतीच्या बळावर आपण निवडून आला आहात. त्यामुळे ठाणेकरांची कामे घेऊन तुमच्याकडे येणाऱ्या शिवसैनिकांना वाटाण्याच्या अक्षता लावणे आता बंद करा. महापालिकेत निवडून यायचे आणि कंत्राटदार व्हायचे हे यापुढे सहन केले जाणार नाही. सत्तेतून मिळणाऱ्या

रसदेचा वाटा सर्वसामान्य शिवसैनिकांनाही मिळायला हवा याचे भान राखा,’ अशा शब्दात शिंदे यांनी उपस्थितांना सूचक इशारा दिला.

‘महापालिकेत पक्ष सांगेल तेच धोरण राबविले जायला हवे. प्रशासनातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या जवळ जायचे आणि आपल्याला हवे ते पदरात पाडून घेताना पक्षाला वाऱ्यावर सोडायचे हे असले प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत,’ असे सांगताना शिंदे यांनी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनाही दम भरल्याचे समजते. ‘आपल्या पक्षातून निवडून येणारे काही नगरसेवक पुढे ‘सर्वपक्षीय’ होतात. पक्षाची ध्येयधोरणे, व्यूहरचना इतर पक्षांतील नेत्यांपर्यंत पोहोचवली जाते. सगळ्यांशी मैत्री जपताना पक्षाच्या हिताला धक्का पोहोचता कामा नये,’ असा इशाराही शिंदे यांनी या वेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:12 am

Web Title: thane municipal corporation election results 2017 shiv sena thane corporators eknath shinde
Next Stories
1 वरळीच्या कल्याणी यांना दुहेरी गृहलाभ!
2 चिमण्यांसाठी ठाणेकरांचा चिऊकाऊचा घास
3 ‘अर्धवटरावां’ची शंभरी जल्लोषात
Just Now!
X